COVID19 : मूर्तिजापूरात झाली कोरोनाची भयप्रद एंट्री; शहराचा निम्मा भाग सील

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 May 2020

राष्ट्रीय महामार्ग सहालगत असूनही हा तालुका व शहर आजवर कोरोनाच्या तावडीत सापडू शकला नाही.

मूर्तिजापूर (जि.अकोला) : अकोला शहर आणि बाळापूर तालुक्यानंतर आता या शहरात कोरोनाची एंट्री झाली असून ही एंट्री यासाठी भयप्रद आहे की, येथील कोरोनाबाधीत माजी नगरसेवकाच्या अंत्यविधीला अनेकांनी हजेरी लावली, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचा शोध घेण्यास यंत्रणा सरसावली आहे, तर जुनी वस्ती पूर्णतः सील झाली आहे.

राष्ट्रीय महामार्ग सहालगत असूनही हा तालुका व शहर आजवर कोरोनाच्या तावडीत सापडू शकला नाही. येथील उप विभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांच्या शिस्तबध्द नियोजनामुळे शक्य झालेल्या या सुस्थितीला कालच्या प्रकारामुळे गालबोट लागले.

आवश्यक वाचा -बब! सोन्यापेक्षाही महाग असलेल्या कस्तुरीच्या मातीची हवेली, तीही महाराष्ट्रातील या जिल्ह्यात, सुगंधासाठी पर्यटकही...

येथील जुन्या शहरातील एका माजी नगरसेवकाला, उच्च रक्तदाबाचा उपचार करीत असलेल्या येथील दोन खासगी डॉक्टरांनी अकोल्याला जाण्याचा सल्ला दिला. अकोल्याच्या सर्वोपचार रूग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी (ता.13) त्याचा मृत्यू झाला. लगेच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शोकाकूल वातावरणात अंतिम संस्कारही उरकण्यात आले. असंख्य लोकांची अंत्यसंस्काराला उपस्थिती होती आणि काल रात्री तो व्यक्ती कोरोना पॉझीटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आणि एकच खळबळ उडाली.

त्यासरशी यंत्रणा आज तातडीने कामाला लागली, परंतु काही प्रश्न या निमित्याने उपस्थित होत आहेत. तपासणी अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द कसा करण्यात आला ? 144 कलम लागू असूनही अंत्यसंस्काराला गर्दी उसळली कशी ? लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसविल्या गेलेच कसे ? संपर्कात आलेल्या असंख्य लोकांचा शोध घेणार कसा ? प्रशासनाला अंतर्मुख करणाऱ्या या प्रश्नांची उत्तरे सापडतीलही, परंतु एका चुकीमुळे या शहरात घुसलेला कोरोना हुसकावून लावणार कसा ? हा प्रश्न मात्र सर्वांनाच निरूत्तर करणारा आहे.

आज सकाळी 10 वाजता आमदार हरीश पिंपळे, नगराध्यक्षा मोनाली कमलाकर गावंडे उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, एसडीपीओ भोसले, तहसीलदार प्रदीप पवार, मुख्याधिकारी विजय लोहकरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.राजेद्र नेमाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रामचरण राठोड यांची तातडीची बैठक तहसील कार्यालयात झाली. युद्धपातळीवर काम करण्याचा निर्णय झाला. लगेच यंत्रणा कामाला लागली. 

पठाणपुरा सील झाला. दुपारपर्यंत जुनी वस्ती पूर्णतः सील झाली. कोरोनाबाधीत मृतक माजी नगरसेवकाच्या कुटुंबीयांसह सुमारे 40 जणांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील शासकीय तंत्रनिकेतमधील वसतीगृहाच्या (विलगीकरण कक्षातरुपांतरीत) इमारतीत ठेवण्यात आले. त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविला जाणार आहे. तपासणी आहवाल प्राप्त होईपर्यंत ते विलगीकृत राहाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सर्वांचीच तपासणी केली जाईल
मृतकाच्या संपर्कात आलेल्या सर्वांचीच तपासणी केली जाईल. संपर्कात आलेल्यांनी स्वतः तपासणीसाठी समोर यावे. शासकीय तंत्रनिकेतन मधील वसतिगृहाचे विलगीकरण कक्षात रूपांतरण करण्यात आले आहे. 180 एवढी तेथील क्षमता आहे. जुनी वस्ती पूर्णतः सील करण्यात आली आहे. उद्या संपूर्ण शहरात लॉकडाऊन राहील.
- अभयसिंह मोहिते, उपविभागीय अधिकारी, मूर्तिजापूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona virus's terrifying entry took place in Murtijapur taluka