कोरोना योद्धा :  शेकडो मजुरांच्या रक्‍तबंबाळ टाचांवर केला औषधोपचार 

चंद्रशेखर महाजन 
शुक्रवार, 22 मे 2020

रस्त्यावर वैद्यकीय सुविधा नाही. गावात कोणी घेत नाही. अशाप्रसंगी नागपूर-वर्धा-भंडारा महामार्गावर धावून आला रुई येथील युवा डॉक्‍टर. त्याचे नाव डॉ. अभिषेक हरिभाऊ गाडबैल. गावाजवळच राष्ट्रीय महामार्ग. घरातून बाहेर पडल्यानंतर अगदी हाकेच्या अंतरावर शेकडो मजुरांचे थवे जाताना पाहून त्यांच्या मनात घालमेल झाली.

नागपूर  : कोरोनामुळे अनेकजण उद्‌ध्वस्त झालेत. त्यात मजुरांना तर मोठा फटका बसला आहे. तो मिळेल त्या साधनाने गावाकडे निघाला. पाय रक्‍तबंबाळ झाले, तरी पर्वा केली नाही. फक्‍त जिवंत राहू, या आशेने गावाकडे निघालेल्या मजूर, कामगारांना मदतीचा हात दिला तो डॉ. अभिषेक हरिभाऊ गाडबैल या युवा डॉक्‍टर व त्याच्या मित्राने. रस्त्यावर वैद्यकीय तपासणी करून पायाला भेगा पडलेल्यांना तात्पुरता दिलासा दिला. तर सोबतच सॅनिटायझर मास्क आणि धान्य देऊन त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय करणाऱ्या या युवा डॉक्‍टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

 

हे वाचा— अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला नाकारला पॅरोल; तळोजा कारागृहात शरण येण्याचे आदेश
 

मजूर कोरोनामुळे पूर्णतः उद्‌ध्वस्त 

कोरोनाचे संकट सर्वत्र घोंगावत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी हक्‍काचे घर सोडणारा मजूर कोरोनामुळे पूर्णतः उद्‌ध्वस्त झाला. या आजाराचा विळखा आपल्यालाही घट्‌ट बसेल, या भीतीने हजारो मजूर पायीच गावाकडे निघालेत. 500 किलोमीटर चालून दमलेला हा मजूर कोणत्यातरी गावात आसरा मिळेल आणि दोनवेळेची कुटुंबाची सोय होईल, या आशेवर होता. अनेकांनी त्याला मदत केली. परंतु, 50 किलोमीटरपेक्षा अधिक चालून थकलेल्या आणि दमलेल्या या मजुरांच्या पायाच्या टाचा अक्षरशः रक्‍तबंबाळ झाल्या. 

हे वाचा— आईला कॅन्सर झाला आहे; तिला भेटण्यासाठी पॅरोल मंजूर करा, प्रा. साईबाबाच्या याचिकेवर न्यायालयाने दिला हा निर्णय...
 

चारचाकीमध्ये तपासणी 

रस्त्यावर वैद्यकीय सुविधा नाही. गावात कोणी घेत नाही. अशाप्रसंगी नागपूर-वर्धा-भंडारा महामार्गावर धावून आला रुई येथील युवा डॉक्‍टर. त्याचे नाव डॉ. अभिषेक हरिभाऊ गाडबैल. गावाजवळच राष्ट्रीय महामार्ग. घरातून बाहेर पडल्यानंतर अगदी हाकेच्या अंतरावर शेकडो मजुरांचे थवे जाताना पाहून त्यांच्या मनात घालमेल झाली. आपल्याला काही करता येईल, असे म्हणून त्याने हा निर्णय घेतला. आपल्या चारचाकीमध्ये तपासणीसाठी साहित्य, सॅनिटायझर, मास्क घेऊन मजुरांची तसेच येईल त्या लोकांची तपासणी करू लागला. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे त्याने शुल्क घेतले नाही. औषधी आवश्‍यक सेवा देऊन तो मजुरांवर उपचार करीत होता. एवढेच नव्हे, तर आवश्‍यक अन्नधान्यही त्यांना देऊ लागला. याकरिता त्यांच्या राहुल चव्हाण, योगेश मेश्राम, विशाल राऊत, रितीक सलाम, सूरज कांबळे, प्रवीण इगंळे, सतीश काटेकर, अमित मेश्राम या सहकाऱ्यांनी मदत केली. गेल्या दीड महिन्यापासून डॉ. अभिषेक गाडबैल शेकडो मजूर व लोकांची तपासणी व मदत करीत आहे. तसेच लोकांना धान्यपुरवठा करीत आहे. त्याच्या या मदतीचे अनेकांनी कौतुक केले आहे. 

समाजसेवेचा मिळाला वसा

 डॉ. अभिषेक गाडबैल रुई येथील रहिवासी आहे. त्याची आई येथील सरपंच असल्याने त्याला समाजसेवेचा वसा मिळाला. वडील शेतकरी असून, तेसुद्धा 
काही वर्षे येथील सरपंच होते. त्याचा भाऊ नकूल गमे आणि बादल गाडबैल हासुद्धा त्याला मदत करतो. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या डॉ. अभिषेकला समाजसेवी आवड असून, तो मागील 5 वर्षांपासून चेतना परिवार संस्थेद्वारे शहरातील विविध शाळेत जाऊन गोरगरीब विद्यार्थ्यांची आरोग्यतपासणी व औषधी वितरण करतो. त्याच्या कार्याची दखल अनेकांनी घेतली आहे. कोरोनाविरुद्ध लढणारा तो एक योद्धा असल्याचे मत अनेकांनी व्यक्‍त केले. 

रस्त्यावरून जाणारे मजूर आणि गावात लोकांना आरोग्यसेवा मिळत नसल्याचे पाहून हा निर्णय घेतला. यापूर्वी अनेकदा मोफत आरोग्यसेवा दिली. रस्त्यावरून जाणाऱ्या मजुरांना पाहून मन हेलावून गेले. म्हणूनच आरोग्यसेवेतून मदत करण्याचा निर्णय घेतला. 
-डॉ. अभिषेक गाडबैल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Warrior: Medicine on the bloody heels of hundreds of workers