गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत ४७ दगावले; पाच हजारांच्या जवळपास बाधित

मिलिंद उमरे
Friday, 23 October 2020

नजीकच्या चंद्रपूर जिल्ह्यात मृत्यूसत्र सुरू झाले असतानाही गडचिरोली जिल्ह्यात केवळ एकाच मृत्यूची नोंद होती. पण, अखेर जिल्ह्यातही मृत्यूसत्र सुरू झाले. एका आकड्यावरून ही संख्या हळूहळू दोन आकडी झाली. आता ही संख्या पन्नाशीचा टप्पा पार करीत आहे. यादरम्यान सरकारने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेमुळे ही मृत्यूसंख्या थोपवून धरण्यात बरेच यश आले आहे.

गडचिरोली : जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना महामारीने अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्यातही आपले पाय पसरले आहेत. जिल्ह्यात कोरोना संसर्गाची मृत्यूसंख्या आता अर्ध शतकाकडे वाटचाल करीत आहे. गुरुवारी (ता. २२) संध्याकाळी प्राप्त आकडेवारीनुसार कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४७ झाली आहे. त्यामुळे ही संख्या पन्नाशी पार करण्यास फार अवधी लागणार नाही.

याशिवाय कोरोना बाधितांची संख्या ४ हजार ९७३ म्हणजे पाच हजारांच्या जवळ पोहोचली आहे. त्यामुळे आता अधिक खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

बरेच महिने गडचिरोली जिल्हा कोरोनामुक्त होता. प्रथम लॉकडाउनच्या काळात देशाच्या इतर भागात कोरोना रुग्ण आढळत असताना मात्र या जिल्ह्याला कोरोनाचा स्पर्शही झाला नव्हता. पण, लॉकडाउन हटून विविध राज्यांत अडकलेले मजूर व इतर नागरिक जिल्ह्यात येताच कोरोनाचे रुग्ण आढळून आले. त्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनीही भर घातली.

प्रशासनाचे आटोकाट प्रयत्न

खरेतर विविध राज्यांतून येणाऱ्या या जवानांची तिकडेच तपासणी करून निरोगी जवानांनाच प्रवासाची परवानगी देण्याची गरज होती. पण, जिल्ह्यात हे जवान आल्यावर त्यांना त्यांची चाचणी घेणे व अहवाल सकारात्मक आल्यावर त्यांना विलगीकरणात ठेवून उपचार देण्याचा धोका पत्करण्यात आला. जिल्ह्यात येईपर्यंत या कोरोनाग्रस्त जवानांनी किती जणांना कोरोनाची भेट दिली असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. तरीही जिल्हा प्रशासनाच्या आटोकाट प्रयत्नांनी कोरोनाचा कहर जिल्ह्यात फारसा जाणवत नव्हता.

अवश्य वाचा : आई महिनाभरापासून बेपत्ता असताना बहिणींचे झाले अपहरण; आरोपीचे नाव समोर येताच सर्वांना बसला धक्का

अधिक काळजी घेण्याची गरज

नजीकच्या चंद्रपूर जिल्ह्यात मृत्यूसत्र सुरू झाले असतानाही गडचिरोली जिल्ह्यात केवळ एकाच मृत्यूची नोंद होती. पण, अखेर जिल्ह्यातही मृत्यूसत्र सुरू झाले. एका आकड्यावरून ही संख्या हळूहळू दोन आकडी झाली. आता ही संख्या पन्नाशीचा टप्पा पार करीत आहे. यादरम्यान सरकारने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेमुळे ही मृत्यूसंख्या थोपवून धरण्यात बरेच यश आले आहे. तरीही या महामारीसंदर्भात अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

दोन दिवसांत वाढला मृत्यूचा आकडा

विशेष म्हणजे आता मृतांची आकडेवारी वाढत आहे. २० ते २१ ऑक्‍टोबर या तीन दिवसांत प्रत्येक दिवशी दोघांचे म्हणजे तीन दिवसांत सहा जणांचे कोरोनाने मृत्यू झाले. त्यामुळे सरकारकडून अधिक प्रभावी उपाय योजले जात असताना नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

जाणून घ्या : वांगेपल्लीत जप्त केली 7 लाख 78 हजारांची दारू; बंदीला झुगारून नवरात्रोत्सवातही तस्करी

काही सकारात्मक बाबी

कोरोनामुळे अगदीच घाबरून जायची गरज नाही. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. या कोरोनाने ४ हजार ९७३ नागरिकांना दंश केला असला; तरी यातून ४ हजार १२४ रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत; तर ८०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सरकारच्या जनजागृतीमुळे लोकांमध्येही नियम पाळण्याची सवय निर्माण होत आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे संशयित रुग्णांची आधीच माहिती मिळत असल्याने त्यांना वेळेवर उपचार मिळून मृत्युसंख्या थोपविण्यात यश येत आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जिल्ह्यात आरटी-पीसीआर प्रयोगशाळा प्रारंभ झाली आहे. त्यामुळे कोरोनाची तपासणी होऊन लवकर अहवाल मिळणार असल्याने उपचारही लवकर देता येणार आहेत.

 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona's death in Gadchiroli district is approaching half a century