वांगेपल्लीत जप्त केली 7 लाख 78 हजारांची दारू; बंदीला झुगारून नवरात्रोत्सवातही तस्करी 

खुशाल ठाकरे
Thursday, 22 October 2020

काहीजण अवैधरीत्या दारू वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने अहेरी पोलिसांनी तालुक्‍यातील वांगेपल्ली येथे सापळा रचून 7 लाख 77 हजार 700 रुपये किंमतीच्या विदेशी दारूसह बोलेरो वाहन बुधवारी (ता. 21) जप्त केले. या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

गडचिरोली : एकीकडे दारूबंदी हवी की नको यावर गरमागरम चर्चा झडत असताना नवरात्रोत्सवासारख्या सणासुदीच्या दिवसांतही दारूबंदी झुगारून मोठ्या प्रमाणात दारू तस्करी होत आहे. अहेरी तालुक्‍यातील वांगेपल्ली येथे पोलिसांनी असाच एक दारूतस्करीचा प्रयत्न उधळून लावत चारचाकी वाहनासह 7 लाख 77 हजार 700 रुपयांची दारू जप्त केली.

काहीजण अवैधरीत्या दारू वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने अहेरी पोलिसांनी तालुक्‍यातील वांगेपल्ली येथे सापळा रचून 7 लाख 77 हजार 700 रुपये किंमतीच्या विदेशी दारूसह बोलेरो वाहन बुधवारी (ता. 21) जप्त केले. या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

क्लिक करा - रस्त्यावरील झाडांच्या खोडाला का असतो पांढरा-लाल रंग? जाणून घ्या यामागचं महत्वाचं कारण

अवैधरीत्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती अहेरी पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अहेरी-महागाव मार्गावर वांगेपल्ली येथे सापळा रचला असता भरधाव वेगाने येणारे एम. एच. 32 -सी-2722 या क्रमांकाचे बोलेरो वाहन दिसून आले. पोलिसांनी वाहनाला थांबवून चौकशी केली असता वाहनात मोठ्या प्रमाणात विदेशी दारू आढळून आली. या कारवाईत 7 लाख 77 हजार 700 रुपयांची दारू तसेच बोलेरो वाहन जप्त करण्यात आले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक प्राणहीता अहेरीचे सोमय मुंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रवीण डांगे, सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलिस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील, यादव मेश्राम, जगन्नाथ मडावी, मनोज कुमले यांनी केली. अवैध दारू वाहतूक प्रकरणी चालकासह तिघांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास अहेरी पोलिस करीत आहेत.

जाणून घ्या - सर्तक रहा, आणखी पाऊस येणार म्हणजे येणार!

बोथेडा येथे मोहसडवा नष्ट

गडचिरोली तालुक्‍यातील बोथेडा येथे दारूविक्री होत असल्याची माहिती मिळताच गडचिरोली पोलिस व मुक्तिपथने संयुक्तरीत्या जंगल परिसरात शोधमोहीम राबवली. दरम्यान तीन ठिकाणी आढळून आलेला 9 ड्रम मोहसडवा नष्ट करण्यात आला. तसेच एका ठिकाणाहून 20 लिटर मोहफुलाची दारू देखील जप्त करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे गावातील दारू विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police seized wine stock of rupees 7 lakh plus