लग्नाची वरात निघणारच होती की भावसून निघाली पॉझिटिव्ह, मग प्रशासनाने...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 29 June 2020

नवरदेवाची भावसून कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला व सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. कुटुंब वेगवेगळे राहत असल्यामुळे सूट मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, सर्व समारंभात कोरोनाबाधित महिला सहभागी झाली होती. यामुळे नवरदेवासह सर्वांना गृहविलगीकरणात राहण्याचे आदेश तहसीलदार चव्हाण यांनी दिले. परिणामी तुर्तास तरी काही दिवसांसाठी लग्न स्थगित ठेवण्याची वेळ आली. 

आर्वी (जि. वर्धा) : येथील युवकाचे सोमवारी (ता. 29) नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्‍यातील गोमुखनांदा या गावातील मुलीसोबत येथील साई मंगलकार्यालयात लग्न होणार होते. लग्नाची तयारी झाली. लग्न समारंभस्थळ सजवून तयार करण्यात आले. आचारी ठरले. पाच दिवसांपासून हळदीचे व इतर कार्यक्रम आनंदात सुरू झाले. लग्नात कुणी काय करायच हे ठरविले गेले. दुसऱ्या दिवशी वरात निघणारच की... 

आर्वी येथील युवकाचे सोमवारी लग्ण होणार होते. घरी लग्नाची धामधूम होती. सर्वजण तयारीत मग्न होते. घरात आनंदाचे वातावरण होते. अशात शनिवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास नवरदेवाची भावसून कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला व सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. कुटुंब वेगवेगळे राहत असल्यामुळे सूट मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, सर्व समारंभात कोरोनाबाधित महिला सहभागी झाली होती. यामुळे नवरदेवासह सर्वांना गृहविलगीकरणात राहण्याचे आदेश तहसीलदार चव्हाण यांनी दिले. परिणामी तुर्तास तरी काही दिवसांसाठी लग्न स्थगित ठेवण्याची वेळ आली.

जाणून घ्या - पत्नीच्या जिद्दीसमोर हरला पती; मनावर दगळ ठेऊन इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले, मात्र...

कोरोनाबाधित महिला बुलडाणा अर्बन बॅंकेच्या येथील शाखेत रोखपाल पदावर कार्यरत आहे. गुरुवारी तिला बरवाटत नसल्यामुळे उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात गेली. यावेळी कोरोनाबाधित असल्याचा संशय आल्यामुळे तिचा स्वॅब घेण्यात आला. मात्र, यानंतर सुद्धा तिने गृहविलगीकरणात न राहता कार्यालयीन कामकाज शेवटपर्यंत सुरूच ठेवले. बॅंकेतील र्कर्मचाऱ्यांसोबत ग्राहकांच्यासुद्धा ती संपर्कात आल्याने बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच बॅंक चौदा दिवसांसाठी कुलूप बंद झाली आहे. 

गृहविलगीकरणात शंभरी गाठणार

कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पन्नास लोकांना गृहविलगीकरणात राहण्याचे आदेश दिले आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता झोपटे यांनी दिली. बाधित महिला रोखपाल व पती नगरसेवक असल्यामुळे मोठा जनसंपर्क पाहता गृह विलगीकरणाची संख्या शंभराच्या वर पोहोचण्याची शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona's disturbance came at the wedding ceremony in Wardha