esakal | "त्या' कुटुंबामुळे धामणगाव शहर बफरझोन, वाचा काय आहे प्रकरण...
sakal

बोलून बातमी शोधा

Corona's havoc in Dhamangaon; Number of Patients is four

नागपूर येथून आलेल्या "त्या' तरुणीसह तिच्या दोन मोठ्या बहिणी व आई असे तिघे जण पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन हादरून गेले आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्र व धामणगावात चोख पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला.

"त्या' कुटुंबामुळे धामणगाव शहर बफरझोन, वाचा काय आहे प्रकरण...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) : येथील रमाबाई आंबेडकर नगरातील तरुणी 24 एप्रिल रोजी नागपूर येथून धामणगावात आली होती. रुग्णालयात उपचरादरम्यान तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली. तिच्या घरातील चार जणांचे स्वॅब घेतले होते. त्यापैकी तिघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान धामणगाव शहराला उपविभागीय अधिकारी मनीष गायकवाड यांनी बफर झोन घोषित केले.

नागपूर येथून आलेल्या "त्या' तरुणीसह तिच्या दोन मोठ्या बहिणी व आई असे तिघे जण पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन हादरून गेले आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्र व धामणगावात चोख पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला. रमाबाई आंबेडकर नगरात जण चार पॉझिटिव्ह सापडल्याने एकच खळबळ उडाली. नोकरी, कामानिमित्त बाहेर जाणारे घरातच राहणे पसंत करीत आहेत. लोक दारे, खिडक्‍या बंद करून घरात बसले आहेत. पोलिसांकडूनही घराबाहेर न पडण्याच्या सूचना केल्या जात आहेत.

नगर परिषद प्रशासनाने परिसरात औषध फवारणी केली. संपूर्ण परिसर निर्जंतुक केला. त्यानंतर गटारींवर पावडर फवारणी केली. नगर परिषद आरोग्य विभागाचे कर्मचारी या परिसरात स्वच्छता मोहीम राबवत होते. रमाबाई आंबेडकर नगराकडे येणाऱ्या रस्त्यावरील परिसर सात ठिकाणी लावून सील केला. पोलिस ठाण्याचे निरीक्षक ब्रह्मदेव शेळके यांनी परिसरात फिरून पाहणी केली. चोख बंदोबस्त नेमला असून, या परिसरात येण्यास व तेथून बाहेर जाण्यास मज्जाव केला आहे.

जिल्हा व राज्यबंदीबरोबरच रेड झोन व अन्य झोनमधील नागरिकांनी विनापरवाना तालुक्‍यात प्रवेश कसा केला? घर, गाव व माणसांच्या ओढीने आलेल्या या नागरिकांमुळे कुटुंबासह इतर समाजव्यवस्थेला धोका पोहोचणार याविषयी गांभीर्यच नाही. धामणगावातील चार कोरोनाबाधित रुग्ण असल्याचे निष्पन्न झाल्याने तालुका भीतीच्या छायेखाली आला आहे. दरम्यान छुप्या मार्गाने बरेच लोक आले आहेत, त्यामुळे या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून आणखी नवीन व्यक्तींचा शोध घेण्यात प्रशासनाला वेळ द्यावा लागत आहे.

गोळीबार चौकातील पाच जण कोरोना पॉझिटिव्ह, नागपुरातील एकूण संख्या झाली...

वडिलांचा अहवाल निगेटिव्ह


बाधित चारही लोकांच्या संपर्कातील नातेवाईकांना आरोग्य यंत्रणेने तातडीने ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना सक्तीने क्वारंटाईन केले. दरम्यान कोरोना बाधित तरुणीचे काका, काकू व त्यांच्या मुलाचे स्वॅब बुधवारला (ता. 19) घेण्यात आले असून, त्याचा अहवाल येत्या दोन दिवसात प्राप्त होईल. कोरोनाबाधित तरुणीच्या वडिलांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान प्रतिबंधित क्षेत्रात दररोज प्रत्येक घराला भेट देऊन आरोग्य तपासणी केली जात आहे. असे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक महेश साबळे यांनी सांगितले
 

कोरोनाबाबत गांभीर्य हवे : सुमेध अलोणे


धामणगाव न.प.चे मुख्याधिकारी सुमेध अलोणे म्हणाले, कोरोना पार्श्वभूमीवर प्रशासन दक्ष राहून जनतेची सुरक्षा जपत आहे. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना धामणगावमध्ये परगावाहून आलेल्या लोकांची नोंद घ्यावी लागत आहे. नागरिकांनी स्वत:बरोबरच कुटुंबाच्या व गावाच्या हितासाठी न.प.कडे अनोळखी अथवा बाहेरून आलेल्या व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे. संचारबंदी काळात अजून नागरिकांना सूचना द्याव्या लागताहेत, हे दुर्दैवी आहे.
 

"त्यांचे' मनोबल वाढवा


तालुक्‍यातील बहुतांशी ग्रामीण भागात संचारबंदीचे पालन गांभीर्याने केले जात नाही. सोशल डिस्टन्सिंगचा अभाव, तोंडाला मास्क न लावणे असा बेफिकीरपणा करत आहेत. तसेच विनाकारण रस्त्यावर येत आहे. मात्र, जनतेच्या सुरक्षितता कामात व्यस्त असणाऱ्या डॉक्‍टर, आरोग्य सेवक, आशा वर्कर्स, शिक्षक व पोलिस प्रशासनाचे मनोबल कसे वाढेल, याबाबत लक्ष देण्याची गरज आहे.