esakal | Coronavirus : गडचिरोली जिल्ह्यात एक संशयित रुग्ण; अमरावतीत वैद्यकीय तपासणी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. अशातच गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्‍यातील नगरम येथील एका संशयिताला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. विदेशातून तसेच पुणे, मुंबईसारख्या शहरातून अमरावतीत आलेल्या नागरिकांची आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय तपासणी केली जात आहे. दरम्यान ऑस्टेलिया येथून परतलेल्या एका नागरिकाला "होम क्‍वारंटाइन' ठेवल्याची माहिती आहे.

Coronavirus : गडचिरोली जिल्ह्यात एक संशयित रुग्ण; अमरावतीत वैद्यकीय तपासणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली/अमरावती : गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्‍यातील नगरम येथील एका संशयिताला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो तेलंगणा राज्यात कामासाठी गेला होता. परत आल्यानंतर त्याला कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने आरोग्य विभागाने त्याला तत्काळ रुग्णालयात भरती केले. शारजा व जर्मनी येथून अमरावतीत आलेल्या नागरिकांना शुक्रवारी (ता. 20) विलगीकरणासाठी व घशाच्या स्त्रावाच्या तपासणीचे नमुने घेण्यासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती आहे.

याशिवाय विदेशातून आलेल्या गडचिरोलीतील 21 जणांना घरीच राहण्याचा सल्ला प्रशासनाने दिला. या सर्वांवर देखरेख ठेवली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते विदेशात होते. मात्र, कोरोनामुळे ते आपल्या स्वगावी परतले. त्यांना 14 दिवसांसाठी घरीच राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यापैकी तीन संशयितांची तपासणी केली असता वैद्यकीय अहवाल नकारात्मक आला आहे.

ऑस्टेलियातून परतलेल्या नागरिकाला "होम क्‍वारंटाइन'

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) : विदेशातून तसेच पुणे, मुंबईसारख्या शहरातून आलेल्या नागरिकांची आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय तपासणी केली जात आहे. दरम्यान ऑस्टेलिया येथून परतलेल्या एका नागरिकाला "होम क्‍वारंटाइन' ठेवल्याची माहिती आहे. दरम्यान शारजा व जर्मनी येथून आलेल्या नागरिकांना शुक्रवारी (ता. 20) विलगीकरणासाठी व घशाच्या स्त्रावाच्या तपासणीचे नमुने घेण्यासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती आहे.

विदेशातून परतणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात येणाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. आतापर्यंत विदेशातून 5 लोक आले होते. त्यापैकी ऑस्टेलिया येथून आलेल्या एकाला "होम क्‍वारंटाइन' ठेवले आहे. शारजा व जर्मनी येथून आलेल्या नागरिकांना शुक्रवारी (ता. 20) विलगीकरणासाठी व उत्तरीय तपासणीचे नमुने घेण्यासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती आहे.

हेही वाचा : स्वतःच्या लग्नाच्या पत्रिका वाटून तो गावाकडे निघाला होता, तेव्हाच काळाने डाव साधला...

रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तपासणी

येथील रेल्वे स्थानकावर आरोग्य विभागातर्फे कोरोना संदर्भातील वैद्यकीय तपासणी पथक शुक्रवार (ता. 20) पासून तैनात करण्यात आले आहे. तसेच अति दक्षता वैद्यकीय पथक स्थापन करण्यात आले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर यांनी सांगितले. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

फ्रान्सहून परतलेल्या दाम्पत्याचे अहवाल निगेटिव्ह

फ्रान्स देशातील पॅरिस येथून प्रथम हैदराबाद नंतर धामणगाव येथे दाखल झालेल्या त्या दाम्पत्याच्या घशाच्या स्त्रावाची तपासणी करण्यात आल्यानंतर हे दाम्पत्य कोरोना निगेटिव्ह असल्याचे समोर आले.