esakal | कोरोनाच्या धास्तीतही युवकाने केले असे..मग पोलिसांनी उचलले हे पाऊल

बोलून बातमी शोधा

file photo

गोंदिया शहरात कोरोना विषाणू संसर्गबाधित रुग्ण गत दोन-तीन दिवसांपूर्वी आढळला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. काल, सोमवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास जयस्तंभ चौकात भररस्त्यात थुंकणाऱ्या एका युवकावर गोंदिया शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या कारवाईतून जिल्ह्यातील नागरिकांनी आतातरी सुधारावे, असा संदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

कोरोनाच्या धास्तीतही युवकाने केले असे..मग पोलिसांनी उचलले हे पाऊल
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गोंदिया : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक उपाययोजना आखल्या आहेत. यापैकी एक म्हणजे रस्त्यावर थुंकण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असतानाही रस्त्यावर थुंकणाऱ्या एका युवकास गोंदिया शहर पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

गोंदिया शहरात कोरोना विषाणू संसर्गबाधित रुग्ण गत दोन-तीन दिवसांपूर्वी आढळला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. शासनाच्या आदेशाची किंबहुना नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे पाऊल उचलले आहे.

विनाकारण फिरू नका

बाजारात असलेली गर्दी, बंदी असूनही सुरू असलेली दुकाने, लॉकडाउन असताना विनाकारण फिरणारे तरुण वा अन्य कोणीही, यांच्यावर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. तरीही कोरोना विषाणू व त्याच्या आजाराला बहुतांश नागरिक गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. कित्येकजण अजूनही विनाकारण बाहेर फिरत आहेत. बहुतेक ठिकाणी गर्दी केली जात आहे. काहींना लॉकडाउन मनोरंजन वाटू लागले आहे.

अड्ड्यावर दारुड्यांच्या रांगा

सायंकाळी ग्रामीण भागांत हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर दारुड्यांच्या रांगा लागल्या असतात. इतकेच काय रस्त्यावर थुंकणेही अनेकांचे थांबलेले नाही. परिणामी, पोलिसांना कारवाईचा दंडुका उगारावा लागत आहे. काल, सोमवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास जयस्तंभ चौकात भररस्त्यात थुंकणाऱ्या एका युवकावर गोंदिया शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या कारवाईतून जिल्ह्यातील नागरिकांनी आतातरी सुधारावे, असा संदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

हेही वाचा : तिथे आढळल्या त्याच्या पाऊलखुणा... गाव दहशतीत

एप्रिल फुल, जरा सांभाळून!

सध्या कोरोना विषाणूची चर्चा आहे. त्यातल्या त्यात बुधवारी (ता. 1) एप्रिल फुल आहे. या दिवशी बहुतांश युवक, युवती व अन्य व्यक्तीदेखील आपल्या प्रियजनांची थट्टामस्करी करीत असतात. विश्वास बसेल, असे संदेश मोबाईल, सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवत असतात. पण हे करताना कोरोना विषाणूविषयी कोणतीही अफवा पसरणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. तसे न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, हे निश्‍चित.