मन सुन्न करणारा अंत्यसंस्कार : खांदेधरी व मुखाग्नी देणार कोण, या प्रश्‍नाचे यांनी दिले उत्तर...

Corporation employees conducted the funeral
Corporation employees conducted the funeral

चंद्रपूर : प्रत्येकाच्या जीवनात मृत्यू हा अटळ आहे. तो कधी येईल? व कसा येईल? हे कुणीही सांगू शकला नाही अन्‌ सांगू शकत नाही. तसेच मृत्यूला कुणी टाळूसुद्धा शकत नाही. मृत्यूनंतर शेवटची भेट म्हणून आप्तेष्ट अंत्ययात्रेत सहभागी होतात. ही वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आहे. कुटुंबीय खांदेधरी होतात. मुखाग्नी देतात आणि सर्व सोपस्कार पार पाडतात. मात्र, कोरोना रुग्णांच्या नशिबी मृत्यूनंतर हे सर्व सोपस्कार येतीलच, असे नाही. असाच एक मन सुन्न करणारा अंत्यसंस्कार पार पडला, वाचा सविस्तर... 

जगात कोरोनाने कहर केला आहे. देशात मार्च महिन्यात कोरोनाची एंट्री झाली. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केंद्र सरकारने लॉकडाउन केले. यानंतर जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, नगरपालिका प्रशासन कोरोनाशी दोन हात करण्यास सज्ज झाले. कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर करावयाचे सर्व सोपस्कार याविषयीची रंगीत तालिमसुद्धा करून ठेवली आहे. कोरोना हा संक्रमित आजार आहे. त्यामुळे एकत्र येण्यावर प्रशासनाने बंदी घातली आहे. अंत्यविधीलासुद्धा विशिष्ट लोकांची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 333 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मात्र, मृत्यूदर शून्य असलेला चंद्रपूर हा पहिला जिल्हा आहे. ही निश्‍चितच जिल्हावासींसाठी सुखदायक बाब आहे. त्यामुळे कोरोना रुग्णाचा मृत्यूनंतरच्या विधी नेमक्‍या कशा होतात, या विषयी जिल्हा अनभिज्ञ होता. अशात शुक्रवारी (ता. 24) रात्री 2.30 वाजताच्या सुमारास तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील जैनढ येथील 75 वर्षीय कोरोना रुग्ण महिलेचा चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. मृत्यूची ही बातमी सर्वत्र पसरली. प्रशासनाने तेलंगणातील महिला असल्याने मृत्यूची नोंद त्याच ठिकाणी होईल, असे स्पष्ट केले. 

मात्र, शहरातील घटना असल्याने महिलेच्या अंत्यसंस्काराची सर्व जबाबदारी महानगरपालिका प्रशासनावर होती. कोरोना रुग्ण असल्याने मृतदेह जास्त काळ ठेवणे धोकादायक होते. बराच वेळ नातेवाइकांची प्रतीक्षा करूनही कुणीही हजर झाले नाही. शेवटी महापालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली.

शवविच्छेदनानंतर महिलेचा मृतदेह रुग्णवाहिकेत टाकून पठाणपुरा बाहेरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी खांदा देत मुखाग्नी दिली. हा सर्व प्रकार मनपा कर्मचाऱ्यांसाठीही नवीन होता. मात्र, कोरोना संकटकाळात राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याचे काम या कर्मचाऱ्यांनी केले. कुटुंबीय वेळेवर न पोहोचल्याने मनपा कर्मचाऱ्यांना विधी आटोपावा लागला. कोरोना रुग्ण महिलेचे नातलग न आल्याने खांदेधरी, मुखाग्नी देण्याचे सोपस्कार कर्मचाऱ्यांनी पार पाडले. 

पठाणपुरा स्मशानभूमी पदाधिकाऱ्यांनी केला विरोध

कोरोना रुग्ण महिलेचा मृतदेह घेऊन महानगरपालिकेचे कर्मचारी पठाणपुरा स्मशानभूमीत गेले. कोरोना रुग्ण महिलेवर तेथे अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. परंतु, याबाबतची माहिती मिळताच पठाणपरा स्मशानभूमीच्या पदाधिकाऱ्यांनी महिलेवर अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला. यामुळे काही काळ अंत्यसंस्कारात व्यत्यय आला. यावेळी आयुक्त राजेश मोहिते यांनी पदाधिकाऱ्यांची समजूत काढत विरोध मोडून काढला. त्यानंतर अंत्यसंस्काराचा सोपस्कार पार पडला.

अंत्यसंस्काराचे सोपस्कार विशिष्ट अंतर राखून 
अंत्यसंस्काराला विरोध करणे चुकीचे आहे. जिवंत माणसांपासून हा आजार संक्रमित होतो. मृतदेहापासून संक्रमित होत नाही. अंत्यसंस्काराचे सोपस्कार हे विशिष्ट अंतर राखून पूर्ण करायचे असतात. महापालिकेने कोरोना रुग्णाच्या अंत्यसंस्काराची रंगीत तालीम करून ठेवली. त्याच पद्धतीने अंत्यसंस्कार आटोपण्यात आला. 
- राजेश मोहिते, 
आयुक्त, मनपा, चंद्रपूर

संपादन - नीलेश डाखोरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com