कंत्राटदारासोबत पालिका प्रशासनाचे साटेलोटे, नगरसेवकांचा आरोप; ऑफलाइन सभेसाठी वाहनतळात आंदोलन

corporator agitation for off line meeting in yavatmal corporation
corporator agitation for off line meeting in yavatmal corporation

यवतमाळ : पालकमंत्र्यांनी तीन दिवसांचा अल्टिमेटम दिल्यानंतरही प्रशासनाने दोन दिवस वेळकाढूपणा केला. शुक्रवारी नोटीस न बजावता सोमवारी (ता.12) नोटीस दिली. त्यामुळे कंत्राटदार व पालिका प्रशासनाचे साटेलोटे असल्याचा गंभीर आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंगळवारी (ता.13) केला. ऑफलाइन सभा व उद्यानेदुरुस्ती, पाणीपुरवठा, शौचालयांची वर्कऑर्डर आदी अनेक मागण्यांसाठी सभेवर बहिष्कार घालत वाहनतळात आंदोलन केले. 

कोरोनामुळे ऑनलाइन सभा घेण्यात येते. मात्र, नगरसेवकांनी ऑनलाइन सभेला विरोध करीत ऑफलाइन सभा घेण्याची मागणी केली आहे. भाजपच्या नगरसेवकांनी सोमवारी (ता.12) मुख्याधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले. काँग्रेसच्या नगरसेवकांनी ऑफलाइन सभेची मागणी केली. मात्र, त्यानंतरही सर्वसाधारण सभा ऑफलाइन न घेता ऑनलाइन घेण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, बसप अशा सर्वपक्षीय नगरसेवकांनी नगरपालिकेच्या वाहनतळात ठिय्या मांडला. ऑनलाइन सभेत नगरसेवक उपस्थित नसल्याने सभा तहकूब करण्यात आली. आफलाइन सभेसोबत शहरातील कचरा नियोजन, उद्यानांची दुरुस्ती, उखडलेल्या रस्त्यांवर मुरुम टाकणे आदी अनेक विषयांवर नगरसेवक आक्रमक होते. आंदोलनस्थळी मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांना बोलविण्यात आले. त्यांच्यावर सर्व नगरसेवकांनी प्रश्‍नांची सरबत्ती केली. कचरा कंत्राटदाराला उशिरा नोटीस दिल्याने नगरसेवकांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. नगरसेवकांनी सांगितलेली कामे होत नसल्याचा आरोप अनेक नगरसेवकांनी केला. नगरसेवकांचे महत्व नसेल, तर पालिका बरखास्त करण्याची माणगी काँग्रेसच्या नगरसेविका वैशाली सवाई यांनी केला.

दहा सप्टेंबरला झालेल्या ऑनलाइन बैठकीत शहरात मुरुम टाकण्याच्या विषयाला मंजुरी दिली होती. मात्र, परतीचा पाऊस सुरू झाला तरी प्रशासनाने मुरमाला मंजुरी दिली नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. शहरातील नागरिकांच्या हिताचे प्रश्‍न सर्वसाधारण सभेत न ठेवता चौकाला नावे देण्याचे विषय ठेवले जातात. यावरही नगरसेवकांनी आक्षेप घेतला. प्रशासन नगरसेवकांची कामे करीत नसल्याचा आरोप भाजपच्या नगरसेविका कीर्ती राऊत यांनी केला. आंदोलनात भाजपचे गटनेते विजय खडसे, काँग्रेसचे गटनेते चंद्रशेखर चौधरी, शिवसेना गटनेते गजानन इंगोले, प्रा. डॉ. अमोल देशमुख, जावेद अन्सारी, वैशाली सवाई, दर्शना इंगोले, शुंभागी हातगावकर, कीर्ती राऊत, सुषमा राऊत, भानुदास राजने, दिनेश गोगरकर, विशाल पावडे, संदीप तातेड, जगदीश वाधवानी, मनोज मुधोळकर, रेखा कोठेकर, पुष्पा ब्राम्हणकर आदी नगरसेवक सहभागी होते. 

...तर सभेला अडचण कशी? 
नगरपालिकेतर्फे गेल्या दोन ऑक्‍टोबरला 'सर्वांग सुदंर शाळा' या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नगराध्यक्षांच्या सूचनेनुसार नगरभवनात घेण्यात आला. परंतु, नागरिकांच्या हिताच्या प्रश्‍नांवर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा ऑफलाइन घेतली जात नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com