गोवर, रुबेला लसीकरण बैठकीकडे नगरसेवकांची पाठ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

नागपूर - गैरसमजामुळे गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेला अल्पप्रतिसाद मिळत असल्याने नगरसेवकांच्या माध्यमातून नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याची योजना महापालिका प्रशासनाने आखली होती. परंतु, नगरसेवकांनी मोहिमेसंदर्भात बैठकीकडे पाठ फिरवून प्रशासनाला तोंडघशी पाडल्याचे चित्र आज दिसून आले. त्यामुळे गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेबाबत नगरसेवकांच्या गांभीर्यावरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. 

नागपूर - गैरसमजामुळे गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेला अल्पप्रतिसाद मिळत असल्याने नगरसेवकांच्या माध्यमातून नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याची योजना महापालिका प्रशासनाने आखली होती. परंतु, नगरसेवकांनी मोहिमेसंदर्भात बैठकीकडे पाठ फिरवून प्रशासनाला तोंडघशी पाडल्याचे चित्र आज दिसून आले. त्यामुळे गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेबाबत नगरसेवकांच्या गांभीर्यावरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. 

9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील मुलांना गोवर-रुबेला लस देण्यासंदर्भात महापालिकेने 27 नोव्हेंबरपासून शहरात मोहीम सुरू केली. मात्र, अफवा व गैरसमजामुळे या मोहिमेला अल्प प्रतिसाद मिळत आहे. लसीकरणासंदर्भात अनेक गैरसमज पसरविण्यात येत असल्याने पालकांच्या मनात भीती आहे. परिणामी लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यात अडथळे निर्माण होत आहेत. या मोहिमेच्या यशासाठी आरोग्य विभागातर्फे झोन आरोग्य अधिकाऱ्यामार्फत काल, झोन आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत सहा झोनमधील एकूण नगरसेवकांना मोहिमेसंदर्भात आज होणाऱ्या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले. एका झोनमध्ये सोळा नगरसेवक, यानुसार सहा झोनचे 96 नगरसेवकांनी बैठकीत उपस्थित राहणे अपेक्षित होते. परंतु, मोहम्मद जमाल, यशश्री नंदनवार, संजय चावरे, मनीषा अतकरे, अभिरुची राजगिरे या केवळ पाच नगरसेवक, नगरसेविकांनी हजेरी लावून गांभीर्य दाखविले. परंतु, या बैठकीत 91 नगरसेवक अनुपस्थित असल्याने गोवर, रुबेला लसीकरणाबाबत लोकप्रतिनिधींच्या गांभीर्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहण्यात नगरसेवक मग्न आहेत, अशी कोटीही या बैठकीत एका नगरसेवकाने केली. 

या बैठकीत पालकांच्या मनातील भीती घालविण्यासाठी जनजागृती होणे महत्त्वाचे आहे, असा सूर उपस्थित नगरसेवकांनी लावला. अल्प प्रतिसाद असलेल्या शाळांमधील मुलांच्या पालकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देत पुन्हा लसीकरण मोहीम राबवावी, अशी सूचना यावेळी नगरसेवक संजय चावरे यांनी केली. जनजागृतीसाठी शहरातील लोकप्रतिनिधी तसेच मोठ्या नेत्यांचे आवाहन करणारे व्हिडिओ प्रसारित करण्यात यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. बैठकीत पाच नगरसेवकांशिवाय मनपा आरोग्य अधिकारी डॉ. भावना सोनकुसरे, डब्ल्यूएचओचे प्रतिनिधी डॉ. मोहम्मद साजिद, डॉ. एस. श्रीधर, लसीकरण अधिकारी डॉ. सुनील घुरडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. नरेंद्र बहिरवार, समन्वयक सोनाली नागरे आदी उपस्थित होते. 

उर्दू शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांत भीती 
यावेळी महापालिकेतील बसप गटनेते मोहम्मद जमाल यांनी उर्दू शाळांमधील पालक लसीकरणाला भीतीपोटी विरोध करीत असल्याचे नमूद करीत गोवर, रुबेलाच्या उच्चाटनात अडथळे निर्माण होत असल्याचे सांगितले. मुस्लिमबहुल भागांमध्ये जनजागृती करणारे व लसीकरणाचे महत्त्व पटवून देणारे व्हिडिओ दाखविण्यात यावे, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला केली.

Web Title: corporator ignored Gover Rubella vaccination meeting