प्रहारने काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा! वर्धा शहरातील अमृत योजनेच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

अमृत योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही प्रहारने केला आहे. या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची आणि सुरू असलेल्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज प्रहार जनशक्‍ती पक्षाच्या वतीने प्रतीकात्मक अंत्ययात्रा नगरपालिकेत नेण्यात आली.

वर्धा : शहरात सुरू असलेल्या अमृत योजना आणि मलनिस्सारणच्या कामामुळे रस्त्यांची वाट लागली आहे. ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवल्याने नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्यावरून पायी चालणेही कठीण झाले आहे. अमृत योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही प्रहारने केला आहे. या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची आणि सुरू असलेल्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज प्रहार जनशक्‍ती पक्षाच्या वतीने प्रतीकात्मक अंत्ययात्रा नगरपालिकेत नेण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष अतुल तराळे यांना निवेदन दिले.

अमृत योजनेअंतर्गत शहरात वाढीव पाणीपुरवठा योजना तसेच मलनिस्सारण योजनेचे काम सुरू आहे. यासाठी भूमिगत पाइपलाइन टाकण्यासाठी शहरात ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. चेंबर तयार करण्यासाठी खोल खड्डे तयार केले आहेत, कंत्राटदाराने खड्डे बुजविताना दुर्लक्ष केले आहे. गोंड प्लॉट, शास्त्री चौक ते पावडे चौक, वंजारी चौक, रेल्वेस्थानक, जिल्हा सामान्य रुग्णालय आदी अनेक रस्ते खोदून ठेवले आहे. एकाही रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. परिणामी सर्व रस्ते चिखलमय झाले आहे. या रस्त्यांनी नागरिकांना जीव मुठित घेऊन आवागमन करावे लागत आहे. शहरात दररोज किरकोळ अपघात घडत आहेत.

सद्य:स्थितीत इतवारा बाजारात काम सुरू असून मोठ मोठे खड्डे खोदले आहेत, परंतु ठेकेदाराने खड्डे खोदताना कुठलीच काळजी घेतली नाही. खड्ड्यांच्या ठिकाणी बॅरेकेट्‌स व रेडियमसुद्धा लावले नाही. परिणामी, रात्रीच्या सुमारास भरधाव वाहने खड्ड्यामध्ये पडून अपघात घडत आहेत.

या योजनेअंतर्गत शहरात सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप प्रहारने केला आहे. लॉकडाउनमध्ये नागरिकांवर उपासमारीची वेळ आली असताना ठेकेदाराचे करोडो रुपयांचे बिल मंजूर केले आहे. शहरात सुरू असलेल्या गटार योजना व वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम तत्काळ पूर्ण करावे, या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी प्रहारचे जिल्हाध्यक्ष विकास दांडगे यांच्या नेतृत्वात अनोखे आंदोलन करू प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून नगरपालिकेत नेली. यावेळी नगराध्यक्ष अतुल तराळे यांना निवेदन दिले.

अनेक जण पडले खड्ड्यात
शहरात भूमिगत गटार योजनेंतर्गत चेंबर तयार करण्यासाठी ठिकठिकाणी खोल खड्डे तयार केले आहेत. या खड्यांच्या सभोवताल कठडे नाहीत व सूचना फलकसुद्धा लावले नाही. परिणामी, आतापर्यंत या खड्ड्यांमध्ये पडून अनेक जण जखमी झाले आहेत.
हेही वाचा - चंद्रपूर जिल्ह्यात चोवीस तासांत सात कोरोना बाधित, राज्य राखीव दलाच्या तीन जवानांचाही समावेश
वाहनांमुळे चेंबर खचले
शहरात तयार करण्यात आलेले चेंबर वाहनाच्या वर्दळीने खचले आहे. आताच तयार करण्यात आलेले चेंबर खचल्याने या कामावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी बसस्थानकाजवळील चेंबरवरून खासगी बसचे चाक गेल्याने चेंबर खचला आहे. कंत्राटदाराला पुन्हा चेंबर तयार करावा लागला. या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे दिसून येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corruption in Amrut yojana