भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही ! - पोलिस उपायुक्‍त एस. चैतन्य

अनिल कांबळे
मंगळवार, 3 जुलै 2018

नागपूर - दोन वाहनचालकांकडून वाहतूक पोलिस हवालदाराने दोनशे रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे पोलिस विभागाची प्रतिमा मलिन झाली होती. त्यानंतर वाहतूक पोलिस उपायुक्‍त एस. चैतन्य यांनी वाहतूक पोलिस हवालदाराला निलंबित केले असून वाहतूक शाखेत भ्रष्टाचार सहन केल्या जाणार नाही, असा इशारा पोलिस उपायुक्‍त चैतन्य यांनी दिला आहे. जितेंद्र साखरे (चेम्बर-3, दोसरभवन) असे निलंबित केलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. 

तीन दिवसांपूर्वी, ग्रेट नाग रोडवरील अशोक चौकात चेम्बर तीनमध्ये कार्यरत असलेले पोलिस हवालदार जितेंद्र साखरे कार्यरत होते. दुपारच्या सुमारास दोन वाहनचालकांना साखरे यांनी अडविले. त्यांना वाहन चालविण्याचा परवाना आणि कागदपत्रे मागितले. मात्र, त्यापैकी एका वाहनचालकाने जितेंद्र यांच्या खिशात पैसे कोंबले तर दुसऱ्या वाहनचालकाला पोलिसाने स्वतःच्या दुचाकीच्या डीक्‍कीत शंभर रूपयांची नोट टाकण्यास सांगितले. त्या युवकाला शिवीगाळ करून शंभर रूपयांची लाच घेतली. हा प्रकार एका युवकाने मोबाईलमध्ये कैद केला. तो व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. पोलिस विभागाच्या अनेक वॉट्‌सऍप ग्रूपमध्ये फिरला. या व्हिडीओमुळे पोलिस विभागाची प्रतिमा खराब झाली होती. हा व्हिडीओ पोलिस आयुक्‍त आणि पोलिस उपायुक्‍तपर्यंत पोहचला. एस. चैतन्य यांनी हवालदाराला निलंबित केले. 

शहरातील तुकडोजी पुतळा, मेडीकल चौक, मोमीनपुरा, सीताबर्डी, व्हेरायटी चौक, उत्तर अंबाझरी मार्ग, कंट्रोल वाडी, वर्धा रोड, इंदोरा चौक, पाचपावली, महाल यासह अन्य ठिकठिकाणी चार ते सहा वाहतूक पोलिस एकत्र येऊन वाहनचालकांना अडवितात. कागदपत्र आणि परवाना नसणाऱ्या चालकांना दीड-दोन हजार दंडांची रक्‍कम सांगून दोनशे ते पाचशे रूपये उकळतात. वाहतूक पोलिसांच्या अशा कृत्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होत आहे. या प्रकाराकडे पोलिस आयुक्‍तांना लक्ष देण्याची गरज आहे. 

वाहतूक पोलिस नागरिकांना सुविधा देण्यासाठी असून लुटण्यासाठी नाहीत. वाहतूक नियंत्रित करण्याला पोलिसांनी प्राधान्य द्यावे. वाहतूक शाखेत अजिबात भ्रष्टाचार सहन केल्या जाणार नाही. कुणाचीही गय केल्या जाणार नाही. थेट निलंबनाची कारवाई करण्यात येईल. 
- एस. चैतन्य, वाहतूक पोलिस उपायुक्‍त.

Web Title: Corruption bribe crime Police Commissioner S. Chaitnya