esakal | गडचिरोली जिल्ह्यातील दोन लाखांचा रस्ताच झाला बेपत्ता
sakal

बोलून बातमी शोधा

gadchiroli

दोन वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेला रस्ता गायब झाला असून रस्त्यालगतची नाली मात्र, शाबूत असल्याने रस्ता गेला कुठे असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात गेल्या महिनाभरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कामाबद्दल तक्रारी समोर आल्या आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील दोन लाखांचा रस्ताच झाला बेपत्ता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धानोरा (जि. गडचिरोली) : शासकीय कामांमधील भ्रष्टाचार ही नित्याचीच बाब आहे. रस्ते बांधकाम हा तर पैसे खाण्याचा सोपा मार्ग समजला जातो. परिणामी निकृष्ट बांधकामामुळे रस्त्यावरचे खड्डे आणि त्यानंतरचे आरोप-प्रत्यारोपही नेहमीचेच. मात्र अख्खा रस्ताच्या रस्ताच गायब होण्याने नेमके झाले काय, याविषयी संशय निर्माण झाला आहे.

दोन वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेला रस्ता गायब झाला असून रस्त्यालगतची नाली मात्र, शाबूत असल्याने रस्ता गेला कुठे असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात गेल्या महिनाभरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कामाबद्दल तक्रारी समोर आल्या आहेत.

धानोरा तालुक्‍यातील देऊळगाव ते मिचगाव खुर्द रस्त्याच्या बांधकामाबद्दल वाद सुरू असतानाच आता याच तालुक्‍यातील आणखी एका नवेगाव ते उदेगाव रस्त्याचे बांधकाम संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. विशेष म्हणजे रस्ता अस्तित्वात नसताना 30 लाखांचे मोरीचे बांधकाम दाखविण्यात आले. या रस्ता बांधकामाबाबतची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी 18 सप्टेंबर 2018 ला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन चौकशीचे आदेश दिले होते. परंतु या रस्त्याच्या प्रकरणाबाबत अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने चौकशीबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात गेल्या अनेक वर्षापासून रस्ते बांधकामाचे विषय सतत गाजत आहेत. कुठे थातूरमातूर तर कुठे कागदोपत्री काम दाखविल्याची ओरड सुरू आहे. गेल्या महिन्यात भामरागड तालुक्‍यात 70 लाख रुपयांचा रस्ताच गायब असल्याची बाब समोर आली होती. या प्रकरणात दोन अभियंत्यांवर कारवाई करण्यात आली. उदेगाव ते नवेगाव या अस्तित्वात नसलेल्या रस्त्यावर 30 लाखांचे मोरी बांधकाम करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देऊळगाव ते नवेगाव रस्ता अस्तित्वात नसतानाही रस्ता बांधकाम दाखवून निरुपयोगी जागेवर 30 लाखांचे मोरी बांधकाम करण्यात आले. यासंदर्भात 16 मे 2018 रोजी जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली होती.

सविस्तर वाचा - नियम सांगणारे मुंढे नियमबाह्य का वागतात? महापौरांचा सवाल, वाचा विशेष मुलाखत
अभियंत्यांच्या पत्राला केराची टोपली
नवेगाव ते उदेगाव या रस्त्यावर मोरी बांधकाम मंजूर करण्यात आले होते. या कामाबाबत उपविभागीय अभियंता यांनी आक्षेप घेतला होता. हा रस्ताच अस्तित्वात नसल्याने तसेच उदेगावला लागून मोठा नाला आहे. या नाल्याला लागून शेती आहे. त्यामुळे या ठिकाणी मोरी बांधकाम करणे योग्य नसल्याचे रीतसर पत्र उपविभागीय अभियंता यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता यांना दिले होते. परंतु त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवून कंत्राटदाराला पाठीशी घालण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.