कपाशीला जडलाय पातीगळतीचा आजार; शेतकरी संकटात 

cotton
cotton

पुसद (जि. यवतमाळ) : विदर्भात कापूस बीजोत्पादनात आघाडीवर असलेल्या पुसद तालुक्‍यातील रोहडा गावात "पातीगळ'मुळे कापूस बीजोत्पादन संकटात सापडले आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून पातीगळ वाढल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेले बीजोत्पादन निम्मे घटण्याची भीती व्यक्त होत आहे. 

तालुक्‍यातील माळपठारावरील रोहडा हे गाव कपाशीच्या बिजोत्पादनासाठी गेल्या अनेक वर्षांपासून नावारूपाला आले आहे. या गावातील ७६९ हेक्‍टर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कपाशीचे बीजोत्पादन घेतले जाते. सध्या दीड हजार प्लॉट्‌सवर शेतकरी बिजोत्पादनाच्या प्रक्रियेत गुंतले आहेत. यंदा वेळोवेळी व पुरेसा पाऊस झाल्याने कपाशी पिकाची चांगली वाढ झाली. पात्या व फुलेही लगडली. परंतु, बदलत्या हवामानाचा फटका कपाशी पिकाला मोठ्या प्रमाणावर बसला.

बिजोत्पादनासाठी नर व मादी फुलांमध्ये संकर घडवून आणतात. या परागीकरणप्रक्रियेसाठी दर दिवशी एका प्लॉटमध्ये सुमारे सात हजार मादी फुलांमागे किमान एक हजार नर फुलांची आवश्‍यकता असते. परंतु, पातीगळ झाल्याने नर फुलांची संख्या एकदम घटली आहे. 

सध्यास्थितीत केवळ चाळीस ते पन्नास नर फुले पाहावयास मिळतात. त्यामुळे परागीकरणप्रक्रिया मंदावली आहे. परागीकरण न झाल्यास मादी फुलांची गळ होऊन बीजोत्पादन होऊ शकत नाही. हवामानातील बदलामुळे पातीगळ प्रमाण अधिक असल्याने बिजोत्पादनासाठी आवश्‍यक असलेली परागिकरणाची प्रक्रिया काही शेतकऱ्यांनी थांबविली आहे.

या बिजोत्पादनात एकरी दहा क्विंटल कपाशीचे उत्पादन अपेक्षित असून, प्रतिक्विंटल 18 हजार रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळतो. परंतु, पातीगळमुळे एकरी दहा क्विंटलपासून चार ते पाच क्विंटलपर्यंत कपाशीचे उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कोट्यवधीची उलाढाल निम्म्यावर येण्याची शक्‍यता आहे. रोहडा नजीकच्या बेलोरा, कुंभारी, मारवाडी या गावांतही काही प्रमाणात कपाशीचे बीजोत्पादन घेतले जाते. येथील कपाशीलाही विषम वातावरणाचा फटका बसला आहे. 

रोहडा गावात शेतकऱ्यांचा कापूस बीजोत्पादन हा मोठा व्यवसाय आहे. अनेक नावाजलेल्या कंपन्या या क्षेत्रात आता उतरल्या आहेत. परागीकरणाच्या दिवसांत घरातील लहान-मोठी सर्वच मंडळी याप्रक्रियेत सहभागी होतात. इतकेच काय तर विद्यार्थीही या कामात हातभार लावतात. यंदा मात्र, बदलत्या हवामानामुळे विपरीत परिस्थिती निर्माण झाली आहे. पातीगळ झाल्याने पुढे पाणी, कळी, फुल, बोंड यापुढील पायऱ्या थांबल्या आहेत. त्यामुळे बिजोत्पादनात मोठी घट होण्याची भीती आहे. 
- शिवाजी गुंजकर, शेतीमित्र, रोहडा. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com