पांढऱ्या सोन्याची उत्पादकता घटली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

अमरावती : बोंडअळीची पर्वा न करता गतवर्षीच्या तुलनेत यंदा कपाशीची जास्त पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलाच. कपाशीची उत्पादकता सरासरी हेक्‍टरी 6 क्विंटल आल्याने डिसेंबर शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना ठरला आहे.

अमरावती : बोंडअळीची पर्वा न करता गतवर्षीच्या तुलनेत यंदा कपाशीची जास्त पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलाच. कपाशीची उत्पादकता सरासरी हेक्‍टरी 6 क्विंटल आल्याने डिसेंबर शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना ठरला आहे.
अमरावती विभागात यावर्षी 10 लाख 25 हजार 900 हेक्‍टरमध्ये कपाशीची पेरणी करण्यात आली. गतवर्षी ही पेरणी 9 लाख 96 हजार 17 हेक्‍टरमध्ये होती. गतवर्षी कपाशीवर गुलाबी, बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने यावर्षी कपाशीच्या पेरणीत घट येईल, असा अंदाज होता. मात्र, शेतकऱ्यांनी त्या संकटाची चिंता न करता यावर्षी कपाशीचे क्षेत्र 30 हजार हेक्‍टरने वाढविले. बोंडअळीचे जीवनचक्र संपविण्यासाठी फरदड आणि डिसेंबरनंतर कपाशी घेऊ नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. तीन वेचणीत कपाशी संपुष्टात आली आहे. पीकविम्याच्या लाभासाठी कपाशीच्या साधारणतः 12 वेचण्या होणे अपेक्षित असते. मात्र, यावर्षी तीन वेचणीनंतर कपाशीला बोंडच शिल्लक राहिलेले नाही. गतवर्षी कच्च्या कपाशीची हेक्‍टरी उत्पादकता सरासरी 849.07 क्विंटल अपेक्षित होती, मात्र प्रत्यक्षात उत्पादन हेक्‍टरी 614 किलो झाले. यावर्षी कोरडवाहू क्षेत्रात हेक्‍टरी चार ते पाच क्विंटल तर बागायती क्षेत्रात हेक्‍टरी सात ते आठ क्विंटल कपाशीचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आलेले आहे. पैकी कपाशीचे बागायती क्षेत्र पेरणीक्षेत्राच्या दहा टक्‍क्‍यांपेक्षाही कमी आहे.
यंदा सोयाबीनला निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांची भिस्त कपाशी व तुरीच्या पिकावर होती. पैकी कपाशीने शेतकऱ्यांचा खेळ खल्लास केला. कीडरोगांनी फस्त केल्याने तुरीचे उत्पादन यावर्षी बाजारात येईल की नाही, याबाबत शंका व्यक्त होत आहे.

 

 

Web Title: cotton production news