
खासगी बाजारात कापसाच्या भावात गेल्या काही दिवसांत चढउतार दिसत आहेत. सलग सुटी व शासकीय हमीभाव केंद्रांकडून होणाऱ्या पैशांच्या विलंबामुळे शेतकरी खासगीत कापूस विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
यवतमाळ : यंदा राज्य पणन महासंघाने उशिरा कापूस खरेदी सुरू केली. त्यानंतरही आतापर्यंत जिल्ह्यातील पणन महासंघाच्या 14 केंद्रांवर दोन लाख 58 हजार 815 क्विंटल कापूस खरेदी झाला आहे. खासगी बाजारात दर पडल्याने शेतकरी पुन्हा शासकीय कापूस खरेदी केंद्राकडे जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अकरा गावांतील मतदार घालणार ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार
जिल्ह्यात यंदा साडेचार लाखांहून अधिक हेक्टरवर कापसाचा पेरा झाला होता. परतीचा पाऊस व बोंडअळीमुळे कापसाचे अतोनात नुकसान झाले. त्यामधून सावरलेल्या शेतकऱ्यांनी उरलेला कापूस वेचणी करून घरी नेला. त्यावेळी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी बाजारात जो दर मिळेल, त्या दरात कापसाची विक्री करावी लागली. विलंबाने का होईना, सीसीआय व पणन महासंघाने कापूस खरेदी केली. यावेळी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यात आली. आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी शासकीय हमीभाव केंद्रांवर कापूसविक्रीसाठी नोंदणी केली होती. या नोंदणीनुसार सीसीआय, पणन महासंघ व खासगीत मिळून साधारणतः 32 लाख क्विंटल कापूस खरेदी होईल, असा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे.
हेही वाचा - बापरे! नागपुरात ३५ पेक्षा अधिक शाळा अनधिकृत, कारवाई होणार का?
दिवाळीनंतर सीसीआय व पणन महासंघाने ठिकठिकाणी कापूस खरेदी केंद्रे सुरू केले. सुरुवातीला 'सीसीआय'च्या खरेदी केंद्रांवर कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली. घाईघाईत पणन महासंघानेसुद्घा खरेदी केंद्र सुरू करून कापूस खरेदीस प्रारंभ केला. अशात पणन महासंघाने आतापर्यंत दोन लाख 58 हजार 815 क्विंटल कापूस खरेदी केला आहे. यवतमाळातील पाच कापूस खरेदी केंद्रांवर 67 हजार 148 क्विंटल, कळंब तालुक्यात 38 हजार 950 क्विंटल, आर्णी तालुक्यातील तीन केंद्रांवर 97 हजार 397, पुसद 18 हजार 431, महागाव येथील केंद्रावर 16 हजार 763 क्विंटल कापूस खरेदी झाला. गुरुवारी (ता.24) 24 हजार 143 क्विंटल कापूस खरेदी झाला. गेल्या काही काळातील या वर्षीची 'पणन'ची खरेदी सर्वाधिक झाली आहे. त्यामुळे यंदा पणन महासंघावर 'लक्ष्मी' कृपा झाल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा - कपाटाची नवी चावी घेऊन घरी आले दोन तरुण अन् घरमालकाला बसला जबर धक्का
खासगीत भावात चढउतार -
खासगी बाजारात कापसाच्या भावात गेल्या काही दिवसांत चढउतार दिसत आहेत. सलग सुटी व शासकीय हमीभाव केंद्रांकडून होणाऱ्या पैशांच्या विलंबामुळे शेतकरी खासगीत कापूस विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, सुटीचे दिवस पाहून व्यापारी कापसाचा भाव कमी जास्त करीत असल्याची ओरड शेतकरी वर्गातून होत आहे. या प्रकाराला कुठे तरी वचक बसणे आवश्यक झाले आहे.