शेतकऱ्यांची कापूस नोंदणीसाठी बाजारसमितीकडे धाव, यंदा पांढऱ्या सोन्याला ५८२५ रुपये हमीभाव

टीम ई सकाळ
Wednesday, 7 October 2020

कापूस खरेदीमध्ये कुठेही गडबड होऊ नये म्हणून पणन आणि सीसीआयचे लवकरच एक मोबाईल अ‌ॅप सुद्धा पुढील काही दिवसात आणणार आहे. शिवाय कापूस नोंदणीसाठी यंदा जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी ग्रीन कार्ड तयार केले जाणार आहे.

यवतमाळ : जिल्ह्यात पणन महासंघ आणि सीसीआयने कापूस खरेदीच्या अनुषंगाने कापूस नोंदणी प्रक्रिया मंगळवारपासून जिल्हाभर सुरू केली आहे. यावेळी लांब धाग्याच्या कापसाला प्रती क्विंटल 5825, असा हमीभाव मिळणार आहे. त्यामुळे आता शेतकरी नोंदणी केंद्राकडे विचारपूस करण्यासाठी बाजार समितीमध्ये येत आहे. 

जिल्ह्यात सर्वाधिक कापूस लागवड केली जाते. खरिपात जिल्ह्यात 9 लाख हेक्टरपैकी साधारण 5 लाख हेक्टरवर कपाशीची लागवड केली आहे. कोरोनाच्या लॉकडाउनमुळे पावसाळा सुरू झाला तेव्हापर्यंत कापूस खरेदी करावी लागली होती. त्यात अनेक ठिकाणी बोगस नोंदणीसुद्धा झाली होती. त्यामुळे कापूस खरेदी करताना मोठा गोंधळ उडाला होता. आता शेतकऱ्यांनीच कापूस खरेदीसाठी कापसाची पूर्व नोंदणी सुरू केली आहे.

हेही वाचा - कुरकुरणारी सायकल अन् थरथरणारे हात; वयाच्या ८२ व्या वर्षीही फळविक्रीतून करतात...

कापूस खरेदीमध्ये कुठेही गडबड होऊ नये म्हणून पणन आणि सीसीआयचे लवकरच एक मोबाईल अ‌ॅप सुद्धा पुढील काही दिवसात आणणार आहे. शिवाय कापूस नोंदणीसाठी यंदा जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी ग्रीन कार्ड तयार केले जाणार आहे. शासनाची कापूस खरेदी सुरू झाल्यावर नोंदणी केलेले शेतकरी तत्काळ कापूस विक्री करू शकतील. या ग्रीन कार्डद्वारे व्यापारी गैरफायदा घेऊ शकणार नाही, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी दिली आहे.

हेही वाचा - मेळघाटात गावांपेक्षा एनजीओंची संख्याच अधिक; समस्या...

कापूस नोंदणीसाठी शेतकरी यांनी चालू हंगामातील सातबारा, त्यावर कापूस पेरा किती आहे, त्यावर गावच्या तलाठ्यांकडून नोंदणी करून सातबारा अद्यावत करणे आवश्यक आहे. बँक पासबुक झेरॉक्स सुद्धा नोंदणी करताना आवश्यक आहे. सध्या ऑफलाइन नोंदणी केली जाईल. नंतर अ‌ॅपद्वारे सुद्धा नोंदणीची माहिती ठेवली जाणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक यांनी दिली आहे. शेतकरी नोंदणी सुरू झाली तरी कापूस खरेदी तत्काळ सुरू करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतात कापूस वेचायला आला असून ही कापूस खरेदी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच सुरू करावी. त्यामुळे खेडा खरेदीमध्ये शेतकऱ्यांची होणारी लूट थांबेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cotton registration process starts in yavatmal