esakal | येथे दररोज होतेय फक्त 20 शेतकऱ्यांकडूनच कापूस खरेदी...डोकेदुखी वाढली
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

विदर्भातील कापूस उत्पादक मोठ्या अडचणीतून जात असताना मंगळवार(ता. 21)पासून पणन महासंघाने कापूस खरेदीला सुरुवात केली आहे. मात्र, एका केंद्रावर दररोज फक्‍त 20 शेतकऱ्यांकडूनच कापूस खरेदी करण्यात येणार आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, म्हणून टोकन पद्धतीने ही खरेदी करण्यात येणार आहे. सरकारने 20 नव्या केंद्रांना परवानगी दिली असून 11 झोनमधून 94 केंद्रांवर ही खरेदी करण्यात येणार आहे.

येथे दररोज होतेय फक्त 20 शेतकऱ्यांकडूनच कापूस खरेदी...डोकेदुखी वाढली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पणन महासंघाने यवतमाळ जिल्ह्यात सोमवार(ता. 20)पासून तीन ठिकाणी कापूस खरेदीला सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात यवतमाळ, आर्णी, कळंब येथील केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यावेळी एका दिवसात 463 क्विंटल कापसाची खरेदी झाली. यात यवतमाळ केंद्रावर 236, आर्णी 227 क्विंटल कापसाची खरेदी झाली. कळंब येथे मंगळवारपासून खरेदीला सुरुवात झाली आहे.

सीसीआयने मंगळवारपासून नोंदणीला सुरुवात केली आहे. सध्या राळेगाव येथील एकच जिनिंग-प्रेसिंग सीसीआयला मिळाली आहे. सीसीआयनेही दररोज 20 शेतकऱ्यांचा कापूस खरेदीचे नियोजन केले असून हे केंद्र 30 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.

अमरावती जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू करण्यात आली असली; तरी मजुरांचा प्रश्न मात्र सुटलेला नाही. सीमाबंदी असल्याने अमरावती जिल्ह्यातील अमरावती, अचलपूर, अंजनगावसुर्जी व नांदगाव खंडेश्वर ही चार केंद्रे सुरू करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, सातपैकी लेहगाव, वरुड व दर्यापूर या तीन केंद्रांवर खरेदी सुरू झाली असल्याचे फेडरेशनचे व्यवस्थापक कांबळे यांनी सांगितले.

सोशल डिस्टन्सिंग पाळूनच होते खरेदी

नांदगाव खंडेश्वर केंद्रावर नेरपरसोपंत येथील मजूर आणण्यास तेथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाने परवानगी दिली नाही. मात्र अमरावती, अचलपूर व अंजनगावसुर्जी या केंद्रांवर मेळघाटातील मजूर होते. त्यांना परत पाठविण्यास सरपंच व पोलिस पाटील यांची परवानगी आवश्‍यक आहे, सध्या ती मिळालेली नाही. लॉकडाउनपूर्वी जिल्ह्यात 3 लाख 49 हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. एकूण सरासरीच्या ती 30 टक्के आहे. उर्वरित कापसाच्या खरेदीसाठी आदेश आहेत. मंगळवारी (ता. 21) सुरू झालेल्या खरेदी केंद्रांवर दररोज 20 शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी संदेश देण्यात येत आहे. असून सोशल डिस्टन्स पाळून खरेदी करण्यात येत असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

असं घडलंच कसं? : Video : दारू पिण्यासाठी तळीरामांनी गाठले ऐंशी किलोमीटर; एका फोनने असा झाला पाहुणचार...

वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांची नोंदणी

वर्धा जिल्ह्यातही फक्त 20 शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यात येणार असल्याने अनेक शेतकऱ्यांसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचा कापूस मोठ्या प्रमाणात घरी पडून आहे. तसेच कापूस खरेदी केंद्र लांब असल्याने त्यांच्यासमोर वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार आहे. दुसरीकडे टोकण पद्धतीमुळे अधिक त्रास होणार असल्याची माहिती आहे. सध्या ग्रीन झोनमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना कापूस खरेदी करण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत. परंतु, वर्ध्यात सध्याच कापूस खरेदी सुरू झाली नसली; तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या नोंदी करण्याच्या सूचना आल्या आहेत. खरेदीसंदर्भात सध्या कुठलीही सूचना नसली तरी रोज 20 शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कापूस नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ

चंद्रपूर जिल्ह्यातही कापूस खरेदीला प्रारंभ झाला आहे. जिनिंग आणि बाजार समित्यामध्ये कापूस खरेदी करण्यात येणार आहे. मात्र, ही कापूस खरेदी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून करण्यात येणार आहे. टोकण घेण्यासाठी गर्दी करण्यात येऊ नये, असेही सांगण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात बहुप्रतीक्षेनंतर सोमवारपासून कापूस नोंदणीला सुरुवात झाली. चंद्रपूर, राजुरा, कोरपना आणि गोंडद्रांवर नोंदणी करण्यात आल्यानंतर खरेदीची प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र, चंद्रपूर आणि गोंडपिपरी येथील खासगी जिनिंगवर एक हजार सातशे, तर गोंडपिपरी केवळ नऊ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. गावापासून केंद्रापर्यंत येण्याची अडचण, माहितीचा अभाव आणि कमी दर या कारणांनी कापूस उत्पादकांनी नोंदणीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. खासगी जिनिंगमध्ये चार हजार तीनशे रुपये भाव आहे. सीसीआयचा भाव पाच हजार रुपये आहे.

जाणून घ्या : काळजी घ्या, विदर्भात वादळी पावसाचा इशारा... वाचा ही महत्त्वाची बातमी

नागपूर जिल्ह्यात खरेदीला परवानगी द्या : आमधरे

नागपूर जिल्हा रेड झोनमध्ये येत असल्यामुळे परवानगी नाकारण्यात येत आहे. त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. पावसाला सुरुवात झाली, तर कापूसाचे नुकसान होईल. दुसरीकडे शेतकऱ्यांचा हंगामही होणार नाही. शहरी भागात कोरोनाचे रुग्ण आहेत. अशाप्रसंगी ग्रामीण भागात कापूस खरेदीला आणि जिनिंग सुरू करण्यात परवानगी देण्यात यावी, अशी मागणी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हुकूमचंद आमधरे यांनी केली आहे.

हेही वाचा : मोहफुलाशी भाकरी खाऊन ढकलताहेत ते एकेक दिवस

केंद्र वाढविण्यात अडचण
शासन आदेशानुसार खरेदीला सोमवारपासून सुरुवात केली आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवून खरेदी केली जात आहे. कोरोनामुळे मजूर येण्यास फारसे उत्सुक नाहीत. यामुळे केंद्र वाढविण्यात अडचण येत आहे. यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- चक्रधर गोस्वामी, व्यवस्थापक, पणन महासंघ.