Video : दारू पिण्यासाठी तळीरामांनी गाठले ऐंशी किलोमीटर; एका फोनने असा झाला पाहुणचार...

Video : दारू पिण्यासाठी तळीरामांनी गाठले ऐंशी किलोमीटर; एका फोनने असा झाला पाहुणचार...

भिवापूर (जि. नागपूर) : कोरोनामुळे देशात हाहाकार माजला आहे. यामुळे देशात लॉकडाउन सुरू आहे. लॉकडाउनमुळे दारू मिळणे कठीण झाले आहे. मात्र, "शौक बडी चिज है' यासाठी दारूडे काहीही करायला तयार असतात. अधिकची किंमत देऊन दारूची खरेदी करीत आहेत. काही सॅनिटायझरवर दारूचा शौक पूर्ण करीत आहेत. मात्र, याच दारूमुळे धिंगाणा घालणाऱ्यांना पोलिसांनी दंडुक्‍याचा चांगलाच प्रसाद दिला. दिवसभर याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होती. 

दिवस रविवारी... नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुका... तालुक्‍यातील जवळी गाव... येथील रहिवासी सोमेश्वरी पुरी... पुरी यांच्याकडे नागपूर येथील रहिवासी दोघे पाहुणे आले... त्यापैकी एक पुरी यांचा साळा तर दुसरा त्याचा मित्र होता... आल्या आल्याच दोघांनी सोबत आणलेली दारू रिचवून चांगलाच धिंगाणा घालायला सुरुवात केली. यानंतर त्यांनी सोमेश्वर पुरी यालाही दारू पाजली... आणि चांगलाच धिंगाणा घालायला सुरुवात केली. 

हळुहळू ही वार्ता गावात पसरली. लॉकडाउन काळात नागपूरचे पाहुणे दारू पिऊन गावात धिंगाणा घालीत असल्याचे समजताच त्यांनी पुरी यांच्या घराजवळ गर्दी केली. एका गावकऱ्याने याची माहिती भिवापूर पोलिसांना दिली. सूचना मिळताच बिट जमादार डाहाके यांनी सहकाऱ्यांसह जवळी येथे धाव घेतली. पोलिस ताफ्यासमोरही नागपुरी पाहुण्यांचा धिंगाणा घालणे सुरूच होता. हे पाहून संतापलेल्या डाहाके यांनी त्यांना घराबाहेर काढून बदडायला सुरुवात केली. 

सरकारी दंडुक्‍याचा पाहुणचार मिळताच दोन्ही पाहुण्यांची झिंग लगेच उतरली. नंतर दोघांनाही वाहनात टाकून पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध विविध कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवून सूचनापत्राच्या आधारावर सोडण्यात आले. पोलिसांकडून करण्यात आलेल्या मारहाणीचे काही तरुणांनी चित्रांकन करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याने सर्वत्र बेवड्या पाहुण्यांना मिळालेल्या प्रसादाच्या चर्चा होत्या.

भाडेकरूला लावले हुसकावून

दारू पिल्यानंतर साळ्याने जुना वाद उकरून काढत सोमेश्वरशी चढ्या आवाजात भांडायला सुरुवात केली. त्यांचा हा वाद बराच वेळ सुरू होता. दरम्यान, पुरी यांच्याकडे भाड्याने राहात असलेले डॉ. पालांदूरकर यांनी मध्यस्थी करीत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागपूरच्या तळीरामांनी उलट त्यांच्याशीच वाद घालत धाक दपटशा करीत हुसकावून लावले. 

सकाळपासून लागाता बेवड्यांच्या रांगा

जवळीपासून काही अंतरावर असलेल्या गरडापार येथे गावठी दारू मुबलक प्रमाणात मिळते. लॉकडाउनमुळे दारू दुकाने, बिअरबार बंद असल्याने तळीरामांनी आपला मोर्चा गावठीकडे वळविला आहे. गरडापार येथे सकाळपासूनच बेवड्यांच्या रांगा लागून असतात. 

दारू पिण्यासाठीच गाठले जवळी

नागपूरला राहणाऱ्या सोमेश्वर पुरी याला ही बाब माहीत आहे. त्यामुळे मित्राला सोबत घेऊन तो मुद्दाम दारू पिण्यासाठी जवळी येथे आला होता. येताना त्याने वाटेत पडणाऱ्या गरडापार येथून दारू विकत घेतली होती. दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या नागपूर येथील दोघांना भिवापूर पोलिसांनी चांगलेच बदडून काढले. खास दारू पिण्यासाठी नागपूरवरून जवळीला आलेल्या या पाहुण्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून नंतर सूचनापत्राच्या आधारे सोडण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com