खड्ड्यांच्या तक्रारीची दखल सात दिवसांत घ्या

खड्ड्यांच्या तक्रारीची दखल सात दिवसांत घ्या

नागपूर : रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात नागरिकांनी महापालिका व वाहतूक पोलिस विभागाने उपलब्ध करून दिलेल्या सोशल मीडिया साईट्‌सवर तक्रार दाखल करावी. या तक्रारींची सात दिवसांत संबंधित विभागाने दखल घ्यावी. मुदत संपल्यानंतरही तक्रारीची दखल न घेतल्यास पोलिस विभागाने प्रकरणाच्या चौकशीची सुरुवात करावी. तसेच, चौकशीदरम्यान तीन दिवसांच्या आत संबंधित अधिकारी किंवा विभागाविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. 
शहरातील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर 29 नागरिक जखमी झाले. या घटनांची गंभीरतेने दखल घेत न्यायालयाने स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मागील पाच महिन्यात अनेक दुर्घटना घडल्या. मात्र, याकडे महापालिका व पोलिस विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे कारण देत ही जनहित याचिका दाखल करून घेण्यात आली आहे. यापूर्वी, न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस आयुक्तांनी यावर शपथपत्र दाखल करीत माहिती दिली. त्यानुसार, रस्त्यावरील खड्डे व टिप्पर चालकाच्या निष्काळजीपणामुळे रस्ते अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी टिप्पर चालक व बीएसएनएलच्या खोदकाम ठेकेदाराविरुद्ध लकडगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, विना परवानगी खोदकाम करून वाहतुकीस धोका निर्माण केल्याबद्दल मंगळवारी झोन येथील पाणी पुरवठा विभागा(ओसीडब्ल्यू)च्या ठेकेदाराविरुद्ध सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली. याप्रकणी आज (ता. 16) झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने वरील दोन्ही प्रकरणात 4 नोव्हेंबरपर्यंत दंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याचे राज्य सरकारला आदेश दिले. याप्रकरणी न्यायालयीन मित्र म्हणून ऍड. राहिल मिर्झा यांनी कामकाज पाहिले. तर सरकारतर्फे ऍड. सुमंत देवपुजारी व महापालिकेतर्फे ऍड. सुधीर पुराणिक यांनी बाजू मांडली. यावर आता 8 नोव्हेंबर रोजी सुनावणी निश्‍चित करण्यात आली आहे. 
मनपाचीही ई-मेल, फेसबुक सुविधा 
वाहतूक पोलिस विभागाने खड्ड्यांच्या तक्रारी नोंदविण्याकरिता सोशल मीडिया साईट्‌स उपलब्ध करून दिल्याची माहिती काल उच्च न्यायालयाला दिली. त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकीत महापालिकेनेही खड्ड्यांसंदर्भात नागरिकांना तक्रार दाखल करण्यासाठी सोशल मीडिया साईट्‌सची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामध्ये, ई-मेल ः ngppotholescomplaints@gmail.com, ट्विटर लिंक ः https://.com?ngpnmc आणि फेसबुक लिंक ः https://m.facebook.com/ngpnmc यांचा समावेश आहे. 
31 जानेवारीपर्यंत प्रकरण निकाली काढा 
शहरातील रस्त्यावरील खड्डे आणि त्यामुळे झालेल्या अपघातप्रकरणी संबंधित व्यक्तींवर लकडगंज व सदर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही प्रकरणात दंडाधिकारी न्यायालयात 4 नोव्हेंबरपर्यंत दोषारोपपत्र दाखल करा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले. तसेच, दंडाधिकारी न्यायालयाने या दोन्ही प्रकरणावर जलगतीने सुनावणी घेत 31 जानेवारी 2020 पर्यंत प्रकरण निकाली काढावे, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com