esakal | दीपाली चव्हाण आत्महत्या : एम. एस. रेड्डीला पोलिस कोठडी, नागपुरातून केली होती अटक

बोलून बातमी शोधा

deepali chauhan suicide
दीपाली चव्हाण आत्महत्या : एम. एस. रेड्डीला पोलिस कोठडी, नागपुरातून केली होती अटक
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धारणी (अमरावती) : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी अखेर निलंबित आयएफएस अधिकारी व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी याला नागपूर येथून बुधवारी (ता. २८) मध्यरात्री ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुरुवारी (ता. २९) पहाटे धारणीत पोहोचले. येथील न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, असे पोलिस निरीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले.

हेही वाचा: निवडणुकीच्या काळात हात जोडून मतं मागणारे लोकप्रतिनिधी कोरोनाकाळात गेले कुठे? नागरिकांचा सवाल

गुरुवारी दुपारी एक वाजता धारणी पोलिस ठाण्यामधून रेड्डीला न्यायालयात आणण्यात आले. न्यायालयाच्या निर्देशानुसार त्वरित कोरोना चाचणीकरिता पाठवण्यात आले. त्यानंतर १.३० वाजता परत न्यायालयात आणण्यात आले. पोलिसांनी सात दिवसांचा रिमांड मागितला. न्यायालयाने रेड्डींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यावेळी तपास अधिकारी पूनम पाटील, ठाणेदार विलास कुलकर्णी, प्रशांत गीते, देवेंद्र ठाकूर, मंगेश भोयर, सचिन होले, अरविंद सरोदे उपस्थित होते. विशेष म्हणजे, प्राथमिक चौकशीसाठी आलेल्या अपर पोलिस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे या बुधवारी (ता. २८) पहाटेच अमरावतीवरून मुंबईकरिता रवाना झाल्या. त्यांना जाऊन २४ तास होत नाही तोच रेड्डींविरुद्ध गुन्हा दाखल होऊन अटक झाली.

हेही वाचा: नागपुरात कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल ४ लाख पार; आज नव्या ७,४९६ रुग्णांची भर

उपविभागीय पोलिस अधिकारी पूनम पाटील यांनी रेड्डीला धारणीत आणल्यानंतर त्याची प्राथमिक चौकशी करून काही बाबींची माहिती घेतली. बयाण नोंदविले. गुन्हा दाखल होऊन अटकेनंतर निलंबित अधिकारी रेड्डींनी नेमकी कोणती माहिती तपास अधिकाऱ्यांपुढे उघड केली, याचा गोषवारा बाहेर येऊ शकला नाही. रेड्डीला चौकशीअंती गुरुवारी (ता. २९) दुपारी धारणी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत (ता. एक) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

दृष्टिक्षेपातील ठळक घटनाक्रम

  • २५ मार्च - दीपाली चव्हाण यांची आत्महत्या.

  • २६ मार्च - विनोद शिवकुमारला नागपुरात अटक.

  • ३१ मार्च - चौकशीसाठी आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती.

  • ३१ मार्च - महिला आयोगाकडून मुख्य वनसंरक्षकांना नोटीस.

  • ३१ मार्च - एम. एस. रेड्डी निलंबित.

  • ४ एप्रिल - रेड्डींचा जामीन अर्ज फेटाळला.

  • ५ एप्रिल - शिवकुमारवरील दाखल कलमांमध्ये वाढ.

  • २४ एप्रिल - शिवकुमारचा जामीन अर्ज फेटाळला.

  • २६ एप्रिल - डॉ. प्रज्ञा सरवदे अमरावतीत.

  • २८ एप्रिल - मध्यरात्री नागपूर येथून रेड्डीला अटक.