Video : आमच्या गुरांना कुणी चारा देता का चारा? 'लॉकडाउन'मुळे  काठेवाडी गवळी सैरभैर

yavatmal farmer
yavatmal farmer

पुसद (जि. यवतमाळ) : दोन-तीन पिढ्यांआधी गुजरात प्रांतातून भटकंती करत आलेला काठेवाडी गवळी समाज पुसद- दिग्रस परिसरात स्थिरावला आहे. दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या गीर गाईंच्या दुग्ध व्यवसायातून मेहनतीने चार पैसे गाठीशी बांधले आहेत. मात्र, कोरोनामुळे 'लॉकडाउन'च्या काळात वाहतूक ठप्प असल्याने गाईंच्या चाऱ्यासाठी काठेवाडी गवळींची फरफट होत आहे. पावसाळ्यात त्यांच्यासमोर चाऱ्याचे मोठे संकट उभे राहणार असल्याच्या भीतीने गवळी समाज सैरभैर झाला आहे.

काठेवाडी गवळी हा भटका समाज पुसद तालुक्यातील घाटोडी जंगलालगत तसेच दिग्रस तालुक्यातील सिंगदजवळील भिलवाडी गावात गेल्या ५० वर्षांपासून वास्तव्यास आहे. भिलवाडी ही एक हजार वस्तीची स्वतंत्र ग्रामपंचायत असून काठेवाडी गवळी समाजाची  ५० घरे आहेत. प्रत्येक कुटुंबाकडे किमान शंभर गीर जातीच्या गाई आहेत. या एकट्या गावात अडीच हजार गाई असल्याने दूध- दुभत्याची चंगळ पहावयास मिळते.

प्रत्येक कुटुंबातून किमान शंभर ते सव्वाशे लिटर दूध दररोज विक्री करण्यात येते. पुरुष मंडळी स्वतः मोटरसायकलने पुसद परिसरात डेअरीवर दूध विक्री करतात. दुग्ध व्यवसायातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. पिकांची उलंगवाडी झाली की, शेतकरी आपल्या शेतांमध्ये काठेवाडी गाई बसवतात. त्यातून गाईंना चारा मिळतो. परंतु शेतकरी स्वतः 'लॉकडाउन'मुळे त्रस्त असल्याने  काठेवाडी गाईंचा चाऱ्याचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. वनखाते गाईंच्या चराईसाठी मनाई करते.

जवळपास अडीच ते तीन हजार गाईंसाठी पावसाळ्यात चाऱ्याची साठवणूक गवळी लोक करतात. चारा मिळवण्यासाठी हे लोक उमरखेड, हिमायतनगर, हातगावपर्यंत जातात. तुर, करडई, भुईमुगाचे कुटार तसेच कडबा मोठ्या प्रमाणात विकत घेतात. एकीकडे शेतकरी 'लॉकडाऊन'मध्ये अडकला आहे; तर दुसरीकडे तर चाऱ्याची वाहतूक बंद आहे. त्यामुळे गवळी लोक कात्रीत सापडले आहे. भिलवाडीचे मफू जाधव व माला जाधव यांनी वाकद भागात चाऱ्यासाठी गुरुवारी, (ता. १६)  शेतकऱ्यांची भेट घेतली. मात्र, त्यांना चारा मिळू शकला नाही. वाहतुकी बंद असल्याने लांब अंतरावरून चारा आणणे शक्य नाही. त्यामुळे चारा साठवणे कठीण झाले आहे.

परिणामी गाईंवर उपासमारीची पाळी येईल व दुग्धव्यवसायाला फटका बसण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे चारा वाहतुकीसाठी मुभा मिळावी, सध्यातरी भुकेने व्याकूळ झालेल्या गाईंना दात्यांनी चारा पुरवावा, त्यासाठी चारा डेपो सुरू करावे, अशी याचना काठेवाडी गवळी करीत आहे. 'लॉकडाउन'चा गैरफायदा घेत दूध खरेदीदार व डेअरीमालक दुधाला कमी भाव देत आहेत. ४० ते ५० रुपये प्रतिलिटर मिळणारा भाव पंचवीस रुपये पर्यंत घसरला आहे. या दुग्ध व्यावसायिकांचे निव्वळ शोषण होत आहे, या गैरप्रकाराला आळा बसावा, अशी जिल्हा प्रशासनाकडून त्यांची अपेक्षा आहे.

मुळात भटकी जमात असलेले काठेवाडी गवळी शासकीय योजनांपासून वंचित आहेत. त्यांच्याकडे रेशन कार्ड, आधार कार्ड नाहीत. त्यांची मुले कशीबशी शाळा शिकतात. महाविद्यालयात जातात. मात्र त्यांना नोकरीसाठी जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे भटक्या जमातीतील या लाभार्थींना कुठलाही लाभ मिळत नाही. शिक्षणानंतर या मुलांना गायी चारण्याशिवाय पर्याय राहत नाही. शासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे त्यांचे भवितव्य अंधकारमय बनले आहे.

माझ्याकडे १०० गिर गाई आहेत. त्यांच्यापासून दररोज १२५ लिटर दूध मिळते. मात्र 'लॉकडाउन'मुळे दूध खरेदीदार व डेअरीमालक निम्मेच भाव देत आहेत. :लॉकडाउन'मुळे वाहतूक बंद आहे. त्यामुळे चारा मिळविण्याची कठीण समस्या निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने काठेवाडी गवळींच्या प्रश्‍नांकडे लक्ष द्यावे.
- मफू वगड जाधव, भिलवाडी 
 

मला शंभर गाईंसाठी दररोज दोन टन चारा लागतो. सध्या चाऱ्याची टंचाई आहे. त्यातच 'लॉकडाउन'मुळे वाहतूक बंद आहे. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातून चारा आणणे शक्य नाही. पुढे पावसाळा आहे. आजच्या परिस्थितीत चाऱ्याची साठवणूक न केल्यास पावसाळ्यात चाऱ्याअभावी जनावरांची खस्ता हालत होईल. लॉकडाउन परिस्थितीत ढेप, चुरी, तुरीचे कुटार वैरण वाहतुकीसाठी मुभा मिळावयास हवी.
- माला जोधा जाधव, भिलवाडी

माझे बारावीपर्यंतचे शिक्षण सिंगदला झाले. मात्र जातीचे प्रमाणपत्र मिळू शकले नाही. त्यामुळे पोलिस भरतीपासून मी वंचित राहिलो. आमच्या गावातील किमान दहा मुले पुसद, दिग्रस येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. परंतु जात प्रमाणपत्राअभावी त्यांचे भवितव्य अंधकारमय आहे. आमचे पूर्वज भटके असल्याने त्यांची कागदपत्रे मिळणे कठीण आहे. शासनाने दखल घ्यावी व भटक्यांना मुख्य प्रवाहात आणावे.
- विक्रम लाला जाधव, भिलवाडी


शासनाने काठेवाडी गवळींच्या जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा. शिवाय दूधविक्रीतील त्यांचे शोषण थांबवावे. कोरोनासारख्या विषाणूजन्य संसर्ग रोगामुळे चाराटंचाई निर्माण झाली आहे. मी आज एक ट्रॅक्टर चारा या समाजाला गायीकरिता दान दिला आहे. इतरांनीही भूतदया दाखवून या लोकांना आपल्याकडे चारा उपलब्ध असेल तर द्यावा.
- मनीष जाधव, शेतकरी नेते, वाकद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com