अधिकारी असावा तर असा! अमरावतीच्या सीपींनी रस्त्यावर उतरून बेशिस्तांना सुनावले

Amravati CP
Amravati CP

अमरावती ः नवनियुक्त पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शनिवारी (ता. १२) रस्त्यावर उतरून बेशिस्तांना खडेबोल सुनावले. अस्ताव्यस्त पार्किंग, दुकानदारांनी दुकानाच्या बाहेर ठेवलेल्या वस्तू, त्यामुळे वाहतुकीला होत असलेला अडथळा पाहून त्या संतापल्या.

महत्त्वाची बाब म्हणजे आयुक्तालयाचा कारभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शनिवारी शहर कोतवाली ठाण्याला दुपारी दोनच्या सुमारास अचानक भेट दिली. आयुक्तांच्या भेटीची पूर्वकल्पना नसल्याने दुपारी दोनच्या सुमारास त्यांचे वाहन ठाण्यात आल्याचे बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या. पोलिस निरीक्षकांच्या कक्षात त्यांनी ठाण्यातील महत्त्वाचे रजिस्टर मागवून त्याची तपासणी केली. काही ठिकाणी योग्य त्या सूचना केल्या. कर्मचारी, अधिकाऱ्यांना झालेल्या किरकोळ चुकीबद्दल निर्देशही दिले. जे कामचुकार होते, त्यांच्या मनात सीपी अचानक आल्यानंतर आपल्याला काय प्रश्‍न विचारतील, याच विचारात असल्याचे दिसून आले. 

शहर कोतवाली ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी जयस्तंभ चौक ते जवाहर गेट, मालवीय चौक, चित्रा चौक ते इतवारा बाजार, कॉटन मार्केटच्या भाजीबाजार परिसराची पाहणी केली. जयस्तंभ ते जवाहरगेट मार्गावर व्यापारी प्रतिष्ठानांसमोरील बेशिस्त वाहन पार्किंग त्यांच्या दृष्टीस पडली. बऱ्याच मोठ्या व्यापाऱ्यांनी आपल्या प्रतिष्ठानांसमोर त्यांचे फलक, काहींनी शोभेचे पुतळे, तर बऱ्याच ठिकाणी दुकानातील वस्तू ठेवलेल्या दिसल्या. त्या वस्तू, फलके आपल्या प्रतिष्ठानात ठेवण्याचे निर्देश त्यांनी व्यापाऱ्यांना दिले. पोलिस निरीक्षक शिवाजी बचाटे यांच्यासह त्यांचे पथक सीपींच्या पाहणी दौऱ्यासोबत होते. 

दोन कारचालकांना चालान

जयस्तंभ ते जवाहरगेट मार्गावर एका प्रतिष्ठित कापड दुकानासमोर रहदारीच्या रस्त्यावर दोन कार अवैधरीत्या पार्क केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होताना आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्यांनी बेशिस्त कारचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यास पोलिसांना भाग पाडले.

मास्क वापरण्याच्या सूचना

मुख्य बाजारपेठेत बरेच लोक गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरता फिरताना दिसले. त्यापैकी काहींना प्रत्यक्ष बोलावून गर्दीत फिरताना मास्क वापरण्याच्या सूचना दिल्या, अन्यथा कारवाईची तंबी दिली.

संपादन  ः राजेंद्र मारोटकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com