धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) ः रिमझिम पाऊस आला की अंगणात पडणाऱ्या पावसात खेळण्याचा मोह चिमुकल्यांना आवरत नाही. मात्र, असे पाण्यात खेळणे एका चिमुकलीच्या जिवावर बेतले. तालुक्यातील वाढोणा येथील दहा वर्षे वयाच्या चिमुकलीचा विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली.

चिकी उर्फ स्वामिनी अजय दिवे (वय ८) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. रिमझिम पावसात अंगणाच्या परिसरात ती खेळत होती. दरम्यान, विहिरीजवळ असलेल्या एका झाडाचे पान तोडण्याकरिता ती गेली असता विहिरीमध्ये असलेल्या मोटरमधील जिवंत विद्युत तारांमधून पाऊस आल्याने संचारलेल्या विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का तिला बसला. यात चिकी हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, स्थानिकांच्या मदतीने विद्युत प्रवाह बंद करून तिला लगेच ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
अवश्य वाचा- बालगृहाला कंटाळून ती पडली बाहेर अन् रडत बसली रस्त्यावर....वाचा पुढे
ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी झाल्यानंतर तिचा मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. वाढोणा येथील स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर मुलीच्या आकस्मित जाण्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पाऊस आल्यास सर्वत्र जमीन ओली होते. विहीर किंवा शेतात असलेल्या विद्युत मोटार आदींमधील वायर तुटून त्याचा जमिनीशी स्पर्श होऊन विद्युत प्रवाह संचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पावसाळ्यात शेती किंवा परिसरात वावरताना नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणचे धामणगाव रेल्वेचे उपकार्यकारी अभियंता उदय राठोड यांनी केले आहे.
संपादन ः राजेंद्र मारोटकर