बेरोजगारी हटविण्यासाठी नोकरी हक्क कायदा करा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

भंडारा : देशात बेरोजगारीची फार मोठी समस्या आहे. ती दूर करण्यासाठी नोकरी मागण्याचा कायदेशीर हक्क नाही. म्हणून केंद्र सरकारने "भगतसिंग राष्ट्रीय रोजगार हमी कायदा' या नावाने कायदा करावा, या मुख्य मागणीसह अन्य विषयांना घेऊन ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशन (एआयएसएफ) व ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या युवक, विद्यार्थ्यांसह धरणे आंदोलन करण्यात आले.

भंडारा : देशात बेरोजगारीची फार मोठी समस्या आहे. ती दूर करण्यासाठी नोकरी मागण्याचा कायदेशीर हक्क नाही. म्हणून केंद्र सरकारने "भगतसिंग राष्ट्रीय रोजगार हमी कायदा' या नावाने कायदा करावा, या मुख्य मागणीसह अन्य विषयांना घेऊन ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशन (एआयएसएफ) व ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या युवक, विद्यार्थ्यांसह धरणे आंदोलन करण्यात आले.
यापूर्वी राणा भवन येथे क्रांतिदिनानिमित्त रोजगार आणि शैक्षणिक समस्यांच्या समाधानासाठी मेळावा घेऊन "मागणी दिन' पाळण्यात आला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी एआयएसएफचे अध्यक्ष प्रीतेश धारगावे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून हिवराज उके, पंकज गजभिये, क्रांती उके व भाऊराव गिऱ्हेपुंजे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी क्रांती उके यांनी युवक गीत सादर केले. मेळाव्यात युवक- विद्यार्थ्यांच्या मागण्यांविषयी बोलताना क्रांतिदिनाचा इतिहास, जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त क्रांतिवीर बिरसा मुंडांच्या उलगुलानची माहिती तसेच हिरोशिमा, नागासाकीवर अमेरिकन साम्राज्यवाद्यांनी केलेला बॉम्बहल्ला आदी विषयांवर हिवराज उके यांनी आपल्या भाषणातून प्रकाश टाकला.
दुपारी 2.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागणी दिनानिमित्त निदर्शने करण्यात आली. तसेच 13 मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान, राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या नावे देण्यात आले. त्यात सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना 365 दिवसांच्या रोजगाराची हमी देणारा भगतसिंग नॅशनल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्‍ट या नावाने कायदा करून सरकारने त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. शिवाय रोजगार (नोकरी) मिळेपर्यंत वर्क वेटिंग अलाउन्सच्या रूपात सातव्या वेतन आयोगाच्या किमान समान वेतन इतकी आर्थिक मदत बेरोजगारास मिळावी अशा 13 मागण्यांचा समावेश आहे.
मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे यांना देण्यात आले. केंद्र सरकार तसेच राज्य शासनाला पाठपुरावा करण्याचे सांगितले.
शिष्टमंडळात हिवराज उके, एआयएसएफचे अध्यक्ष प्रीतेश धारगावे, सचिव भाऊराव गिऱ्हेपुंजे, रवी तिघरे, पंकज गजभिये, उपाध्यक्ष क्रांती उके, गंगाधर फाये, साहिल मेश्राम, प्रेरणा गजभिये, अभिलाषा मेश्राम, चेतना उके, मिताराम उके, गौतम भोयर भाऊराव गिऱ्हेपुंजे, नेहा तिजारे यांनी सहभाग घेतला.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Create a Employment Rights Act to eliminate unemployment