esakal | मृतदेहाचा होतो सौदा : या जिल्ह्यातील स्मशानभूमीची अनोखी तऱ्हा
sakal

बोलून बातमी शोधा

cremation_ground_

राजस्थानी मोक्षधाम समितीने आपला मालकीहक्क दाखवित मृतकाच्या परिवाराकडून जबरदस्तीने 1100 रुपयांची पावती फाडण्याचा प्रकार सुरू होता. स्मशानभूमीच्या समोरील गेटला या समितीकडून नेहमीच टाळे लावले जाते. आणि अंतिम संस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोक्षधाम समितीची पावती फाडल्यानंतरच समशानभूमीचे गेट अंत्यसंस्कारासाठी उघडून दिले जाते.

मृतदेहाचा होतो सौदा : या जिल्ह्यातील स्मशानभूमीची अनोखी तऱ्हा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आनंदवन (जि. चंद्रपूर ): मरणाचाही व्यवसाय करणारी माणसे या समाजात आहेत. मृत्यूनंतर प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात. वरोऱ्यातील मृतदेहांचा दाह संस्कार करण्याच्या स्माशभूमीवर मात्र काही लोकांनी अवैध ताबा केला आहे आणि अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या लोकांकडून पैसे वसूल केल्याशिवाय त्यांना इथे अंत्यसंस्काराची परवानगी दिली जात नाही.

राजस्थानी मोक्षधाम समितीकडून मृतकाच्या नातेवाइकांकडून अंत्यसंस्कारासाठी दान पावतीच्या नावाने 1100 रुपये घेतले जातात. वरोरा नगरपरिषद क्षेत्रातील वणी बायपासलगतच्या स्मशानभूमीवर आपला मालकीहक्क दाखवून मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. विशेष म्हणजे, पावती फाडल्यानंतरच अंत्यसंस्कारासाठी मोक्षधामचे कुलूप उघडले जाते.

शहरातील रेल्वेउड्डाण पुलालगतच्या सरकारी जागेवर स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीवर येथील राजस्थानी मोक्षधाम समितीने आपला मालकीहक्क दाखवित मृतकाच्या परिवाराकडून जबरदस्तीने 1100 रुपयांची पावती फाडण्याचा प्रकार सुरू होता. स्मशानभूमीच्या समोरील गेटला या समितीकडून नेहमीच टाळे लावले जाते. आणि अंतिम संस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोक्षधाम समितीची पावती फाडल्यानंतरच समशानभूमीचे गेट अंत्यसंस्कारासाठी उघडून दिले जाते.

येथील महेंद्र तितरे यांच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी राजस्थानी मोक्षधाम समितीने तितरे कुटुंबीयांकडून अंत्यसंस्कारासाठी अकराशे रुपयांची पावती फाडली. कर्त्या पुरुषाच्या निधनाने मोठे संकट ओढवले असताना तितरे परिवाराने 1100 रुपयांची पावती फाडून अंत्यसंस्कार आटोपले.

सरकारी जागेवरील स्मशानभूमीवर आपला हक्क दाखवून मोक्षधाम समिती अवैध वसुली करीत असल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली. त्यानंतर तितरे यांनी उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी नगरपरिषद वरोरा यांना निवेदन देऊन सदर स्मशानभूमीवर हक्क दाखवीत अवैध वसुली केली जात असल्याची बाब दोन वर्षांपूर्वी निदर्शनास आणून दिली.

त्यानंतर नगरपालिका प्रशासनाने राजस्थान मोक्षधाम समितीला मालकीहक्काचे दस्तऐवज सादर करण्यासंदर्भात पत्र दिले. परंतु, मोक्षधाम समिती मालकीहक्काबाबत कुठलीही कागदपत्रे सादर करू शकली नाही. त्यामुळे आता कोणत्याही प्रकारचे दान, शुल्क आकारू नये आणि स्मशानभूमीच्या गेटला कुलूप लावू नये, असे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहेत.

शुल्क आकारू नये
अंत्यसंस्कारासाठी कोणतेही दान, शुल्क राजस्थान मोक्षधाम समितीने यापुढे आकारू नये. तसेच गेटलासुद्धा कुलूप लावू नये.
सुनील बल्लाळ
मुख्याधिकारी, नगरपालिका, वरोरा

सविस्तर वाचा - आयुक्‍त मुंढेंना आता कोणी दिला इशारा?

स्मशानभूमी खुली करावी
वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी माझ्याकडून अकराशे रुपयांची अवैध पावती मोक्षधाम समितीने फाडली होती. त्यामुळे माहिती अधिकारातून स्मशानभूमीच्या मालकी हक्काबाबतचे दस्तऐवज प्राप्त केले. तसेच स्मशानभूमी विनामूल्य सर्वांसाठी खुली करण्याची मागणी नगरपरिषदेकडे केली होती.
महेंद्र पंढरीनाथ तितरे
वरोरा