व्यापाऱ्याच्या मुलाची आत्महत्या क्रिकेट सट्ट्यामुळे! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मार्च 2017

अमरावती- शहरातील प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या विवाहित मुलाने केलेली आत्महत्या ही कौटुंबिक कारणातून नसून क्रिकेट सट्ट्यामुळेच असावी, या निष्कर्षाप्रत पोलिस यंत्रणा पोहोचलेली आहे. पोलिस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी शनिवारी तसे संकेत दिलेत. 

अमरावती- शहरातील प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या विवाहित मुलाने केलेली आत्महत्या ही कौटुंबिक कारणातून नसून क्रिकेट सट्ट्यामुळेच असावी, या निष्कर्षाप्रत पोलिस यंत्रणा पोहोचलेली आहे. पोलिस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी शनिवारी तसे संकेत दिलेत. 

बुधवार, 8 मार्च रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सातूर्णा परिसरात राहणाऱ्या व्यापाऱ्याच्या विवाहित मुलाने (वय 35) स्वत:च्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्याची ही आत्महत्या कोट्यवधींच्या कर्जामुळे असावी; अशी माहिती असली तरी यासंदर्भात कुटुंबीयांपैकी कुणाचीही पोलिसांत तक्रार नाही; परंतु आत्महत्या ही क्रिकेट सट्ट्यामुळेच करण्यात आली असण्याची माहिती पोलिसांना मिळाली. मागील 12 दिवसांपासून विविध स्तरांवर या प्रकरणाची चौकशी सुरू होती.

आत्महत्या करणाऱ्या युवकाचे कॉल डिटेल्स पोलिसांनी तपासले. त्याच्यासोबत मागील महिन्याभरात कुणी संपर्क साधला, वा कुण्या बड्या आसामींशी त्याने स्वत: संपर्क केला का, या सर्वच बाबींवर पोलिसांचा तपास सुरू होता. प्रकरण संवेदनशील असल्याने पोलिस अद्याप जाहीरपणे बोलायला तयार नाहीत. अमरावतीसह जिल्ह्याबाहेरील बड्या सट्टेबाजांसह काही व्यापाऱ्यांकडून त्या युवकाने सहा ते सात कोटींचे कर्ज घेतल्याचीही माहिती पोलिसांकडे होती. त्यामुळे अशा सर्वच व्यक्तींसोबत अमरावती पोलिसांनी संपर्क सुरू केल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. आत्महत्येपूर्वी विवाहित युवकाने कुणाकडून किती कर्ज घेतले, यासंदर्भात भाष्य करण्याचे मात्र सीपींनी टाळले. आत्महत्या करणाऱ्या युवकासोबत त्याचे श्रीमंत कुटुंबातील काही समवयीन मित्रसुद्धा सट्‌टाव्यवसायात त्याच्यासोबत होते, त्या मित्रांचीही चौकशी पोलिसांनी सुरू केली. त्यामुळे कोट्यवधींच्या अवैध क्रिकेट सट्ट्यातील मोठे घबाड हाती लागण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: cricket betting is reason for girl's suicide