तरुणीची छेड काढणारा निघाला अट्टल चोरटा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 November 2019

अट्‌टल चोरटा असलेल्या नीलेशने आतापर्यंत अनेक ठिकाणी घरफोडी केली आहे. मात्र, तरुणीची छेड काढणे त्याच्या अंगलट आले. त्याने तरुणीशी अश्‍लील चाळे केले. एवढेच नव्हे तर तरुणीच्या अंगातील टी-शर्ट काढून तिला अर्धनग्न करण्याचाही प्रयत्न केला. 

 

 

नागपूर, ता. 9 ः मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका तरुणीची छेड काढण्याच्या प्रयत्नात गिट्टीखदान पोलिसांनी एका कुख्यात चोरट्याला अटक करून त्याच्याजवळून पिस्तूल, 10 जिवंत काडतुसे आणि चोरीच्या ऐवजासह 2 लाख 8 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. नीलेश सुधाकर पुरुषोत्तमवार (28, बल्लारशा, जि. चंद्रपूर) असे या आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश पुरुषोत्तमवार हा नागपुरात गोधनी येथील स्वामीनगरात किरायाने खोली घेऊन राहत होता. 7 नोव्हेंबर रोजी सकाळच्या वेळी एक तरुणी दाभा रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेली होती. त्यावेळी नीलेशने तिचा पाठलाग करून तिचे तोंड दाबून तिचा टी शर्ट ओढला. या प्रकारामुळे तरुणी घाबरली. लगेच ती घरी गेली आणि घडलेला प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. ती आणि तिचे वडील घटनास्थळी आले. त्यावेळी नीलेश घटनास्थळीच होता. मुलीच्या वडिलांना पाहून त्याने आपली दुचाकी घटनास्थळी सोडून पळ काढला. तरुणीने त्याची दुचाकी घरी आणली. त्याचदिवशी दुपारी नीलेश हा तरुणीच्या घरी गेला आणि दुचाकी मागितली. त्यावरून तरुणी आणि त्याच्यात वाद झाला. या वादावादीत त्याने मायलेकीला मारहाण केली. तरुणीने त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिचा ब्लाऊज फाडला. तरुणी आणि तिच्या आईने आरडाओरड केली असता रस्त्यावरील लोकांनी त्याला पकडले. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवून नीलेशला अटक केली. 

घरझडतीत सापडले पिस्तूल 
पोलिसांनी त्याच्या दुचाकीची झडती घेतली असता दुचाकीच्या डिक्कीत घरफोडी करण्याचे साहित्य मिळून आले. त्याची घरझडती घेतली असता त्याच्या घरात एका पोत्यात विदेशी बनावटीचे पिस्तूल, 10 जिवंत काडतुसे, रोख 11 हजार 300 रुपये आणि सोन्याचांदीचे दागिने असा 2 लाख 8 हजारांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी चंद्रपूर पोलिसांसोबत संपर्क केला असता त्याच्यावर चंद्रपूर येथील विविध पोलिस ठाण्यात घरफोडीचे 14 गुन्हे दाखल असल्याचे चंद्रपूर पोलिसांनी सांगितले. गिट्टीखदान पोलिसांनी त्याची पोलिस कोठडी घेऊन सखोल चौकशी केली असता काही दिवसांपूर्वी त्याने जरीपटका हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली. त्या घरफोडीतील दागिने असल्याचे त्याने सांगितले. शनिवारी त्याची पोलिस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला जरीपटका पोलिसांच्या ताब्यात दिले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime, nagpur