प्रेमाच्या तीन शब्दांसाठी तीन वर्षे कारावास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

अल्पवयीन मुलीला आरोपीने म्हटले "आय लव्ह यू'

अल्पवयीन मुलीला आरोपीने म्हटले "आय लव्ह यू'
नागपूर - वर्गात घुसून दहावीतील मुलीला "आय लव्ह यू' म्हणणे एका रोमिओला चांगलेच महागात पडले आहे. अल्पवयीन मुलीसमोर आपली भावना व्यक्त करत तिचा हात पकडल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहम्मद सादिक उमर यांनी संदीप कृष्णाजी कुहीते (वय 40, रा. उपरवाही, कळमेश्‍वर) याला बुधवारी तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.

प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरणाऱ्यांची जगात कमी नाही. मात्र, प्रेम आणि विकृतीमधील अंतर लक्षात न घेता केलेली कृती गुन्ह्याला जन्म देत असते. काहीसा असाच प्रकार उपरवाही येथील शाळेत 7 ऑक्‍टोबर 2014 रोजी घडला. आरोपीने शाळेच्या मधल्या सुटीत वर्गात घुसून एका मुलीला "आय लव्ह यू' म्हटले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मुलीसह सर्वच विद्यार्थी अचंबित झाले.

मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शिक्षक धावून आले. त्यांनी आरोपीला वर्गाबाहेर काढले. यानंतर दुपारी तीनच्या सुमारास कुहीते पुन्हा एकदा वर्गात घुसला आणि मुलीचा हात पकडून तिला दहा रुपये घेण्यासाठी जबरदस्ती करू लागला. त्याने मुलीचे तोंड दाबण्याचादेखील प्रयत्न केला. शिक्षकांनी पकडले असता त्यांना कुहीतेने शिवीगाळ केली.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा गिरडकर यांनी तत्काळ कळमेश्‍वर पोलिस स्थानकात आरोपीविरुद्ध तक्रार नोंदविली.

त्याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा-2012च्या (पोस्को) विनयभंगाच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. प्रत्यक्षदर्शी आणि मुलीचे जबाब लक्षात घेत आरोपीला "पोस्को'अंतर्गत तीन वर्षे कारावास आणि एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने अधिक कारावास, तसेच भारतीय दंडविधानानुसार दोन वर्षे कारावास आणि एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने अधिक कारावास अशी शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सरकारी वकील वसीम काझी यांनी बाजू मांडली.

Web Title: crime in nagpur