तो' मृतदेह सुधाकर रंगारीचा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

नागपूर : गांधीसागर तलावात हात-पाय, शिर आणि धड कापून एका पोत्यात फेकून दिलेला मृतदेहाची ओळख पटविण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली असून तिसऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. सुधाकर देवीदास रंगारी (वय 48, रा. आवळेनगर, जरीपटका) असे खून झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे.

नागपूर : गांधीसागर तलावात हात-पाय, शिर आणि धड कापून एका पोत्यात फेकून दिलेला मृतदेहाची ओळख पटविण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली असून तिसऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. सुधाकर देवीदास रंगारी (वय 48, रा. आवळेनगर, जरीपटका) असे खून झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे.
आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून राहुल पद्‌माकर भोतमांगे (26, बारसेनगर) आणि राहुल ज्ञानेश्‍वर धापोडकर (वय 25, तांडापेठ, चंद्रभागानगर) अशी आरोपींची नावे असल्याचे अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त नीलेश भरणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी गुन्हे शाखेचे उपायुक्‍त गजानन राजमाने उपस्थित होते. 10 जुलै रोजी गांधीसागर तलावात दोन पोत्यांत एका व्यक्‍तीचे शरीराचे तुकडे सापडले होते. पाण्यामुळे शरीराचे अंग कुजलेले होते. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटली नव्हती. घटनेच्या आठवड्याभरानंतर आवळेनगरातील रंगारी कुटुंबीयांनी मुलगा सुधाकर रंगारी अशी मृतदेहाची ओळख पटविली होती. मात्र, तरीही गणेशपेठ पोलिस आणि गुन्हे शाखा पोलिस आरोपींपर्यंत पोहचले नव्हते. शेवटी बुधवारी सकाळी या हत्याकांडातील आरोपींना अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींनी हत्याकांडाची कबुली दिली असून तिसऱ्या साथिदाराचेही नाव सांगितले आहे. तसेच रंगारी यांच्या कुटुंबीयांनीही मृतदेहाबाबत योग्य ती माहिती देऊन ओळख पटविली होती. दोन्ही आरोपींना आज न्यायालयात उपस्थित करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना 13 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
असा लागला सुगावा
गुन्हे शाखेचे योगेश चौधरी, पंकज धाडगे आणि प्रवीण गोरटे यांनी जरीपटक्‍यात खबरे पेरले. त्यांनी मृताच्या कुजलेल्या चेहऱ्यावरून साधर्म्य साधणारा फोटो संगणकाच्या मदतीने तयार केला. तो फोटो जरीपटका हद्दीत अनेकांना दाखवला. हा फोटो सुधाकर रंगारीचा असल्याचे कळले. त्यावरून सुधाकरबाबत माहिती गोळा केली. त्याच्या दोन मित्रांसोबत शेवटी बघितल्याचा पुरावाही पोलिसांच्या हाती लागला त्यावरून हत्याकांडाचा पर्दाफाश केला.
असा केला खून
आरोपी राहुल भोतमांगे आणि सुधाकर रंगारी हे दोघेही मित्र असून ई-रिक्षा चालवीत होते. सुधाकर नेहमी दादागिरी करीत होता. राहुलच्या रिक्षातील प्रवासी उतरवून स्वतःच्या रिक्षात बसवीत होता, तसेच शिवीगाळ करीत होता. नेहमी होणाऱ्या पाणउताऱ्याला कंटाळून राहुलने सुधाकरचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्याने 9 जुलैला कट रचून सुधाकरला दारू पिण्यासाठी बोलावले. राहुलने साथिदार राहुल धापोडकर आणि बंटी या दोघांना बोलावून घेतले. सुधाकरला खूप दारू पाजली. त्यानंतर त्याला रिक्षाने वैशालीनगरात बगिच्यामागे नेले. तेथे सुधाकरच्या डोक्‍यात दगड घालून खून केला आणि बिअरच्या बाटलीने त्याचा चेहरा विद्रूप केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime news