पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय
पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय

उपराजधानीतील गुन्हेगारी नियंत्रणात

नागपूर : शहरातील गुन्हेगारीमध्ये कमालीची घट झाली आहे. पोलिसांनी वेळोवेळी राबविलेल्या विशेष मोहिमांमुळे पोलिसांना यश आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 898 गुन्ह्यांची घट झाली. महिलांवरील अन्याय-अत्याचारांच्या घटनांवर पोलिसांना अंकुश ठेवला, तर मोक्‍का आणि तडीपारांच्या कारवाईच्या सपाट्याने गुन्हेगारांमध्ये पुन्हा पोलिसांचा वचक निर्माण झाल्याची प्रतिक्रिया पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली. ते आज पोलिस जिमखाना येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
पोलिस आयुक्‍त डॉ. उपाध्याय यांनी पदभार सांभाळल्यानंतर सर्वप्रथम शहरातील गुन्हेगारीचा आढावा घेतला होता. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या मदतीने ऑपरेशन क्रिस्प, ऑपरेशन क्रॅकडाउन आणि ऑपरेशन वाईप आउट राबविले. या ऑपरेशनमध्ये तब्बल 16 हजार 377 गुन्हेगारांपर्यंत पोलिस कर्मचारी पोहोचले. त्यांची नोंद घेऊन त्यांच्या हालचालींवर "वॉच' ठेवण्याचे काम सुरू आहे. ऑपरेशन ऑल आउटमध्ये अवैध शस्त्र बाळगणारे, सराईत गुन्हेगार, फरार आणि पोलिस दप्तरी नोंद असलेल्या प्रत्येक गुन्हेगाराला "चेक' करण्यात आले. मागील वर्षाच्या तुलनेत खुनाच्या घटनांमध्ये यंदा 13 ने घट झाली आहे. त्याचप्रमाणे दरोड्याचा प्रयत्न 6, सोनसाखळी पळविणे 41, जबरी चोरी 39, एकूण जबरी चोऱ्या 80, घरफोडी 134, एकूण चोऱ्या 514, वाहनचोरी 165, खंडणी 6, दुखापत 35, बलात्कार 8, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला 9, विनयभंग 10, अपघाताचे 18 गुन्हे कमी झाले. मागील वर्षात एकूण 8,584 गुन्हे घडले होते. त्यात 5,437 गुन्ह्यांची उकल करण्यात आली. 2017 च्या तुलनेत 2018 मध्ये 898 गुन्हे कमी झाले आहेत. त्याची टक्‍केवारी 9 टक्‍के आहे, असेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम, पोलिस उपायुक्त नीलेश भरणे, विवेक मासाळ, चिन्मय पंडित, राहुल माकणीकर, हर्ष पोद्दार, निर्मलादेवी, श्वेता खेडकर, संभाजी कदम, राजतिलक रौशन आदी अधिकारी उपस्थित होते.
सेक्‍स रॅकेटला हद्दपार केले
गुन्हे शाखेच्या एनडीपीएस विभागाने शहरात अंमली पदार्थ विक्री करणारे तसेच तस्करांवर कारवाई करीत वर्षभरात 2 कोटी 82 लाख रुपये किमतीचे ड्रग्स आणि अमली पदार्थ जप्त केले. गुन्हे शाखेचे उपायुक्‍त संभाजी कदम यांनी शहरातील सेक्‍स रॅकेटला हद्दपार केले. हुक्‍का पार्लर तसेच जुगार कायद्याअंतर्गत कारवाई वाढल्यामुळे मोठा वचक निर्माण झाला आहे.
शहरातील अपघात कमी झाले
शहरात मेट्रोची कामे सुरू असल्याने वाहतूक व्यवस्था सांभाळणे मोठी समस्या निर्माण झाली आहे. सक्षम वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेची घडी नीट बसलेली आहे. शहरातील अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. रॅश ड्रायव्हिंग आणि हेल्मेट सक्‍ती आणि ड्रंक अँड ड्राइव्हसाठी विशेष मोहिमांमुळे वाहतुकीची समस्या सुटली आहे.
तडीपारांचा "विशेष बंदोबस्त' करणार
वर्षभरात 16 गुंडांना तडीपार केले, तर 8 गुंडांच्या टोळ्यांवर मोक्‍का लावला. तडीपार आरोपींचा शहरात नेहमी वावर असतो, यावर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याची कबुली आयुक्‍तांनी दिली. मात्र, येत्या काही दिवसांतच तडीपारांचा "विशेष बंदोबस्त' करण्यासाठी उपायोजना करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com