कोरोनाने हिसकावला पांढरे सोने उत्पादकाच्या तोंडचा घास...लॉकडाउनमुळे विक्री थांबली

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 May 2020

यावर्षी सिरोंचा तालुक्‍यात जवळपास 500 हेक्‍टर शेतीमध्ये कापूस लागवड करण्यात आली आहे. यंदा कोरोनामुळे लॉकडाउन झाल्याने विक्रीकरता बाहेर जाता येत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांचे शेकडो क्विंटल कापूस तीन ते चार महिने घरातच पडून राहिल्याने कापूस खराब होऊन काळसर पडत आहे.

सिरोंचा (जि. गडचिरोली) : तालुक्‍याचे मुख्य पीक धान असले; तरी अनेक शेतकरी धानपिकासोबत काही नगदी पिकेही घेतात. त्यामध्ये प्रामुख्याने कापूस, मिरची, हळद, सोयाबीन या पिकांचा समावेश असतो. मात्र, यंदा कोरोनामुळे लॉकडाउन झाल्याने विक्री करता बाहेर जाता येत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

यावर्षी सिरोंचा तालुक्‍यात जवळपास 500 हेक्‍टर शेतीमध्ये कापूस लागवड करण्यात आली आहे. शेतकरी कापूस लागवडीवर लाखो रुपये गुंतवणूक करून आणि वर्षभर कष्ट करून प्रतिकिलो 15 रुपयांप्रमाणे कापूस वेचणी करून पैसे कमावतात. पण, यंदा देशासह राज्यात आलेल्या महाभयंकर कोरोना साथीमुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

जिल्ह्यात एकमेव कापूस खरेदी केंद्र

तालुक्‍यात कापूस उत्पादक शेतकरी असूनही जवळपास एकही कापूस खरेदी केंद्र नाही. जिल्ह्यात एकमेव आष्टी येथेच कापूस खरेदी केंद्र आहे. तेथे दलालांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी त्रस्त होत आहेत. पूर्वी तेलंगणात कापूस विक्री करता येत होती. पण, लॉकडाउनमुळे दळणवळण व्यवस्था पूर्णपणे बंद आहे. कोरोनाच्या भीतीने तेलंगणा सरकार महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना प्रवेश देत नाही. शेतकऱ्यांचे शेकडो क्विंटल कापूस तीन ते चार महिने घरातच पडून राहिल्याने कापूस खराब होऊन काळसर पडत आहे. त्यामुळे समोर शेती कशी करायची म्हणून शेतकरी चिंतेत पडले आहेत.

शेतकऱ्यांकडून 3500 रुपयांत कापूस विक्री

आष्टी येथील दलाल आणि आणि सिरोंचा तालुक्‍यातील काही कापूस खरेदी करणारे व्यापारी 5 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव असताना मात्र ते शेतकऱ्यांकडून तीन हजार पाचशे रुपयांत कापूस विक्री करत असल्याने यामध्ये प्रतिक्विंटल 1500 रुपये नुकसान होत आहे. याचा शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. सिरोंचा तालुक्‍यातील कापूस तेलंगणा राज्यात विक्रीसाठी शासनाने शेतकऱ्यांना ई-पास द्यावा, अशी मागणी सिरोंचा तालुक्‍यातील कापूस उत्पादक शेतकरी करत आहेत.

जिल्ह्यापेक्षा तेलंगणा राज्य जवळ

गडचिरोली जिल्ह्यात असलेले आष्टी येथील एकमेव कापूस खरेदी केंद्र सिरोंचापासून खूप लांब आहे. हे अंतर जवळपास 160 किमी असल्याने शेतकऱ्यांना वाहन भाडे परवडत नाही. जिल्ह्यातील या कापूस खरेदी केंद्रापेक्षा तेलंगणा राज्यातील केंद्र सिरोंचासाठी जवळचे आहे. हे अंतर अवघे 25 किमी आहे. त्यामुळे तिथे त्यांना वाहतूक खर्च कमी येतो.

जाणून घ्या : आता निसर्ग पर्यटनाला चालना देणारे नवे पर्यटन धोरण, स्थानिकांना मिळणार रोजगारही

योग्य भाव मिळत नाही
कापूस वेचणीचा खर्च प्रतिकिलो 15 रुपये झाला आहे. यातच प्रतिक्विंटल 1500 रुपये खर्च होतात. खत, बियाणे, नांगरणी, शेतातील विविध कामांवर वेगळा खर्च करावा लागतो. इतकी मेहनत घेऊन योग्य भाव मिळत नाही. लॉकडाउनमुळे कापूस विक्री करता येत नाही. दलाल तीन हजारांचा भाव देत आहेत. त्यामुळे शेतकरी अधिकच संकटात सापडत आहेत.
- अंकुलू जनगाम, कापूस उत्पादक शेतकरी, वेंकटापूर, ता. सिरोंचा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crisis on cotton farmer due to corona