'एकीकडे परतीच्या पावसानं उभं पीक सडलंय, दुसरीकडं वाघाची दहशत; आम्ही जगायचं कसं?'

crop damaged due to heavy rain in rajura of chandrapur
crop damaged due to heavy rain in rajura of chandrapur

राजुरा (चंद्रपूर): राजुरा तालुक्यात परतीच्या पावसाने शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. शेकडो हेक्टरवरील उभे पीक पावसामुळे सडले. तसेच दुसरीकडे वाघाच्या दहशतीत शेतकरी शेतामध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे आता करायचे काय? कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा? असा प्रश्न बळीराजासमोर उभा आहे.

गेल्या आठवडाभरापासून परतीच्या पावसाने शेती उद्ध्वस्त केली आहे. या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस, सोयाबीन, धान व इतर पिकांची लागवड होते. दिवाळीपूर्वी सोयाबीन व धानाचे पीक शेतकऱ्यांच्या हातात येते. सणासुदीच्या दिवसात एक मोठा आधार शेतकऱ्यांना असतो. आयुष्यभर काळ्यामातीत राबून आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी घाम गाळत असतो. नवी आशा, नवे स्वप्न घेऊन संकटाला न जुमानता बळीराजा उमेदीने शेतात राबतो. मात्र, यावर्षी कोरोना संकटासोबत निसर्गाच्या दुष्टचक्रात शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. शेकडो हेक्टरवरील हातात आलेले उभे पीक उद्ध्वस्त झाले आहे. वादळी पावसामुळे सोयाबीन शेतातच सडला आहे. कापूस काळवंडला, धानाचे पीक जमीनदोस्त झाले. याबाबत आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाकडे निवेदने देण्यात आलेत‌. मात्र, कुठलेही नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश नसल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. सणासुदीच्या पर्वावर हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने बळीराजा पूर्ण हतबल झालेला आहे. कर्ज फेडायचे कसे? असा प्रश्न त्याला पडला आहे.

शासनाच्या मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. दुसरीकडे या क्षेत्रात वाघाने धुमाकूळ घातलेला आहे. त्यामुळे शेतात जाण्यासाठी शेतकरी घाबरत आहेत. आतापर्यंत निरपराध 10 शेतमजूर, शेतकर्‍यांचा नाहक बळी गेला. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत आहे. स्वतःच्या शेत शिवारात फेरफटका मारण्याची हिम्मत बळीराजामध्ये राहिलेली नाही. हे सर्व विदारक चित्र वनविभाग उघड्या डोळ्याने बघत आहे. मात्र, वन विभागातील सुस्तावलेल्या यंत्रणेमुळे  बळीराजा हतबल झालेला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधीही पुढे येत नाहीत. शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या संकटात शासनाने मदत करावी इतकीच रास्त अपेक्षा शेतकऱ्यांकडून आहे. नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com