यवतमाळमध्ये परतीच्या पावसाने दोन हजार हेक्टरला फटका; कुठे उभं पिक, तर कुठे पिकांची गंजी पाण्यात

crop damaged due to heavy rain in yavatmal
crop damaged due to heavy rain in yavatmal

यवतमाळ : जिल्ह्यात जवळपास सर्वच भागात शनिवार, रविवारी दोन दिवस परतीच्या पावसाचे आगमन झाले. या पावसात खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांनी लावलेली पिकांची गंजी, तर कुठे पीक पाण्यात गेले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडांशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला. परतीच्या पावासाने यवतमाळ, दारव्हा तालुक्‍यातील जवळपास दोन हजार हेक्‍टरवरील पिकांना फटका बसला. वीज पडल्याने तीन जनावरे दगावले असून दोन व्यक्ती जखमी झाले आहे. 

जिल्ह्यात मागील दहा दिवसांपासून ऑक्‍टोबर हिटमुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. जिल्ह्यात काही भागात शनिवारी, तर काही भागात रविवारी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह परतीच्या पावसाचे आगमन झाले. यवतमाळ तालुक्‍यातील भांब(राजा)येथे वीज पडल्याने दोन बैलाचा मृत्यू झाला. दारव्हा तालुक्‍यातील करमाळा येथे वीज पडल्याने गायीचा मृत्यू झाला असून, महागाव येथे दोन व्यक्ती जखमी झाले. जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. दारव्हा तालुक्‍यात दुपारी चार वाजतापासून वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यवतमाळ तालुक्‍यातही तसाच पाऊस झाला. यात हातगाव, पिंपरी, वडगाव तर दारव्हा तालुक्‍यातील मांगकिन्ही, चिखली, महागाव आदी गावामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसाचे पाणी शेतात शिरल्याने दोन हजार हेक्‍टरचे नुकसान दिसत असले तरी प्रत्यक्षात नुकसानीचा आकडा कित्येक पटीने जास्त आहे. 

कापूस ओला झाला असून सोयाबीनला मोठा फटका बसला आहे. नैसर्गिक आपत्ती विभागाने दिलेल्या प्राथमिक अहवालावरून दारव्हा तालुक्‍यात जवळपास एक हजार हेक्‍टर, तर यवतमाळ तालुक्‍यातही एक हजार हेक्‍टरवरील पिकांच्या नुकसानीचा अंदाज आहे. शेतपिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर खरा आकडा समोर येणार आहे. मात्र, ऐनवेळी परतीच्या पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा मोठा संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे.
 
धरणे पुन्हा ओसंडली - 
परतीच्या पावसात अगोदरच भरलेली धरणे पुन्हा एकदा ओव्हर फ्लो झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील अनेक प्रकल्पात जलसाठा वाढल्याने काही प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणारे निळोणा, चापडोह प्रकल्प आधीच ओव्हरफ्लो झाले असून परतीच्या पावसाने जलसाठ्यात वाढ झाली आहे. 
 
हेही वाचा - शिवसैनिक म्हणाले, 'ही' तर राणा दाम्पत्याची नौंटकी

'दामिनी'अ‌ॅप वीज पडण्याचे ठिकाण - 
जिल्ह्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसात वीज पडण्याचा घटना घडतात. अशा प्रकारच्या घटना होऊ नये, त्यांची माहिती आधी मिळावी यासाठी केंद्र शासनाने 'दामिनी'अ‌ॅप तयार केले आहे. वीज पडण्याच्या 15 मिनिटांपूर्वी या अ‌ॅपमध्ये स्थळ दर्शविले जाते. त्यामुळे मंडळ अधिकारी, तलाठी यांनी अ‌ॅपबाबत जनजागृती करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com