पीकविम्याची रक्कम बचत खात्यात जमा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

अकोला - सरकारच्या आदेशानंतरही पीकविम्याची रक्कम परस्पर कर्ज खात्यात वळविल्याने दुष्काळाच्या झळा बसलेल्या शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले. ही बाब राज्य सरकारच्या लक्षात आणून दिल्यानंतर पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात तत्काळ जमा करण्याचे निर्देश बॅंकांना दिले आहे.

पीकविम्याची रक्कम मिळाल्यानंतर ती कर्जखात्यात परस्पर वळती करण्यात येऊ नये, असा आदेश राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनातर्फे दिला होता. त्यानंतरही परस्पर रक्कम कर्ज खात्यात वळती करण्यात आली. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर पीकविम्याची रक्कम कर्ज खात्यात जमा केली जात असल्याने शेतकऱ्यांच्या हाती दुष्काळात पडणारी रक्कमही हिरावली गेली. त्यामुळे पेरणीसाठीही पैसे शिल्लक नाही, अशी परिस्थिती आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी आमदार रणधीर सावरकर यांच्याकडे तक्रारी केल्या. आमदारांनी मुंबईमध्ये संबंधित सचिव व मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची माहिती दिली. त्यानुसार राज्याचे मुख्य सचिव डॉ. जैन यांनी पीककर्जाच्या रकमा बचत खात्यात जमा करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासन आणि बॅंक अधिकाऱ्यांना दिले.

शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती वाईट आहे. आधीच नापिकी, दुष्काळ व इतर कारणांमुळे पेरणीचीही सोय नाही. अशा वेळी पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांचा आधार होती. ती परस्पर वळती केल्याने शेतकऱ्यांनी पेरणी कशी करावी, हा प्रश्‍न होता. या परिस्थितीबाबत मंत्र्यांना माहिती दिली. त्यांनी त्यावर बॅंकांना तत्काळ सूचना देऊन वळवलेली रक्कम परत करण्याचा आदेश काढला.
- रणधीर सावरकर, आमदार

Web Title: crop insurance amount saving account