पीकविमा घोटाळा राफेलपेक्षाही मोठा - पी. साईनाथ

P.-Sainath
P.-Sainath

नागपूर - सध्या गाजत असलेल्या राफेल घोटाळ्यापेक्षा पीक विमा घोटाळा मोठा असल्याचा आरोप करून ज्येष्ठ पत्रकार आणि कृषितज्ज्ञ पी. साईनाथ यांनी ही योजना पीकविमा कंपन्यांचे पालनपोषण करणारी असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र शासनाकडून दुष्काळासंदर्भात जाहीर केलेले निकष शेतकरी विरोधी असल्याचीही टीका केली. 

एका कार्यक्रमासाठी नागपुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात दुष्काळी स्थिती आहे. भविष्यात ही स्थिती अधिक भीषण होणार आहे. असे असताना सरकार याबाबत फारसे गंभीर दिसत नाही. राज्यात १५१ तालुक्‍यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला. वास्तविक राज्यात २०० पेक्षा जास्त तालुक्‍यात भीषण दुष्काळी स्थिती आहे.

दुष्काळ जाहीर करताना सॅटेलाइटची मदत घेण्यात आली. सॅटेलाइटच्या मदतीने प्रत्यक्ष गावातील स्थितीची माहिती मिळत नाही. केंद्राने मोठा गाजावाजा करून ‘प्रधानमंत्री पीकविमा’ योजना काढली. कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना सक्तीने विमा काढावा लागतो. गेल्या तीन वर्षांत कंपन्यांना १५ हजार कोटींच्या वर फायदा झाला. त्या तुलनेत शेतकऱ्यांना लाभ झाला नाही.

विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट झाली असली तरी कंपन्यांच्या फायद्यात वाढ झाली. विमा काढणाऱ्या कंपन्यांच्या बॅंका आहेत. ही योजना त्यांच्या फायद्यासाठी आणली आहे. जीएसटी व नोटाबंदीमुळे लघुउद्योजक व कृषी क्षेत्राचेही कंबरडे मोडल्याची टीका साईनाथ यांनी केली. यावेळी शेतकरी नेते विजय जावंधिया उपस्थित होते.

शेतकऱ्यांसाठी आंदोलन 
दुष्काळ आणि शेतीसमस्येवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष सत्र बोलावून चर्चा करण्याच्या मागणीसाठी येत्या २९ व ३० नोव्हेंबरला दिल्ली येथे आंदोलन करून मोर्चा काढला जाणार आहे. देशभरातून लाखो शेतकरी, कार्यकर्ते, विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरवर्ग यात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जे लोक दिल्लीला येऊ शकत नाही त्यांनी शहरातच आंदोलन करून पाठिंबा देण्याचे आवाहन साईनाथ यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com