बळीराजाने मेहनतीने यशस्वी केला "ब्लॅक राईस" चा प्रयोग; मात्र पीक येण्याआधीच निसर्गाचा झाला प्रचंड कोप 

निलेश झाडे 
Sunday, 18 October 2020

गोंडपिपरी तालुक्यात प्रथमच ब्लॅक राईसची लागवड करण्यात आली. गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या धाबा येथील केलिचंद झाडे या तरूणाने प्रायोगिक तत्वावर तिन धान बांद्यात तिन किलो बिजाई रोवली.

गोंडपिपरी ( जि. चंद्रपूर) : आयुर्वेदिक तांदूळ अशी ओळख असलेल्या काळ्या तांदळाचा प्रयोग गोंडपिपरी येथील शेतकऱ्याने केला. धान पिक चांगले जमून आले मात्र शेतकऱ्याचा या प्रयोगावर निसर्गाने पाणी फेरले आहे. वादळी पावसाने धान जमिनीवर लोळले. मोठ्या उत्साहाने काळ्या तांदळाची शेती करणाऱ्या गोंडपिपरी तालुक्यातील केलिचंद झाडे या तरूण शेतकऱ्याचा प्रयोग  निसर्गाच्या लहरीपणाने अयशस्वी ठरला आहे.

गोंडपिपरी तालुक्यात प्रथमच ब्लॅक राईसची लागवड करण्यात आली. गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या धाबा येथील केलिचंद झाडे या तरूणाने प्रायोगिक तत्वावर तिन धान बांद्यात तिन किलो बिजाई रोवली. धान चांगले जमून आले. या धानाने सर्वांचे लक्ष वेधले होते. अनेक शेतकऱ्यांनी झाडे यांच्याशी संपर्क साधून धानाची माहीती घेत होते. 

जाणून घ्या - रेल्वे चुकली अन् तरुणाला सापडला उद्योगाचा मार्ग; आता करतोय हजारोंची उलाढाल

मात्र मागील आठवड्यात आलेल्या वादळी पावसाने काळ्या धानाला जमिनीवर लोळविले. धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यशस्वी झालेल्या प्रयोगावर निसर्ग कोपला. मात्र या संकटाने खचून न जाता पुढच्या वर्षी संपुर्ण शेतात काळ्या धानाची लागवड करणार असल्याची माहिती केलिचंद झाडे या तरूण शेतकऱ्याने दिली.

 

 

 तांदळाचे फायदे 

देशात काळ्या तांदळाच्या वेगवेगळ्या चार ते पाच जातींचे उत्पादन केले जाते. 150 दिवसांमध्ये हा काळा तांदूळ तयार होतो. काळा तांदूळ हा असा एकमेव तांदूळ आहे. त्यापासून बिस्किटे तयार केली जातात. शिवाय आरोग्य स्वस्थ व मजबूत ठेवण्यासाठी याचा फायदा होतो.काळ्या तांदळाला मोठी मागणी आहे. त्यामुळे किमंतही चांगली मिळते. शेतकऱ्यासाठी हा धान फायदेशीर ठरणारा आहे.

अधिक माहितीसाठी - कोरोनाकाळात फुफ्फुस ठेवा स्वस्थ; पुढील उपाय करण्याचा डॉ. मीना देशमुख यांचा सल्ला

"ब्लॕक राईस " तांदळाबाबत मी माहीती घेतली. या तांदळाला बाजारपेठेत मोठी मागणी आहे तसेच बाजारभावही चांगला आहे.  त्यामुळे प्रयोग म्हणून मी तीन किलो बिजाई टाकली. धान चांगला जमुन आला मात्र निसर्गाने घात केला. पुढील हंगामात मी संपुर्ण शेतात ब्लॕक राईसची लागवड करणार आहे.
-केलिचंद झाडे ,
शेतकरी धाबा

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crops of black rice are affected due to heavy rain in vidarbha