नागरिकांनो सावधान! आठवडी बाजारातील गर्दी ठरू शकते धोकादायक; कोरोना संसर्गाची भीती 

crowd at weekly market can be dangerous fear of corona
crowd at weekly market can be dangerous fear of corona

गडचिरोली : जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनाचे थैमान अद्याप सुरू असून जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता लॉकडाउनचे नियम बऱ्यापैकी शिथिल झाले असून रविवारी शहरात भरणारा आठवडी बाजार पुन्हा सुरू झाला आहे. मात्र, आठवडी बाजारातील वाढती गर्दी कोरोना संसर्गाला निमंत्रण देणारी ठरू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.

गडचिरोली शहरातील कारगील चौक परिसरात दर रविवारी आठवडी बाजार भरतो. खरे तर दैनंदिन भाजीपाला खरेदीसाठी स्थानिक त्रिमूर्ती चौक परिसरात रोज गुजरी भरते. पण, बहुतांश नागरिक रविवारचा दिवस खरेदीसाठी राखून ठेवतात. सध्या हा आठवडी बाजार ऐसपैस जागेत भरत असला, तरी येथे ग्राहकांची गर्दी वाढतच आहे. विशेष म्हणजे कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर पाळायचे नियम येथे ग्राहक आणि विक्रेते दोघेही पाळताना दिसत नाहीत. जणू कोरोना समाप्तच झालाय या अविर्भावात अनेकजण दिसतात. कित्येकजण मास्क लावत नाहीत.

पूर्वी लॉकडाउनच्या काळात सुरुवातीला स्थानिक इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी खुल्या सभागृहात भाजीबाजार भरविण्यात आला. त्यानंतर प्रेक्षागार मैदानावर हा भाजीबाजार भरविण्यात आला. येथे येणाऱ्या ग्राहकांवर व विक्रेत्यांवर पालिकेच्या कर्मचाऱ्यांची नजर असायची. येथे हात धुवायला साबण व इतर सुविधा असायच्या. पण, आता रविवारच्या आठवडी बाजारात कोणत्याही प्रकारचे सावधगिरीचे उपाय दिसत नाहीत. 

ग्राहक आणि विक्रेते निर्धास्तपणे वावरत असतात. येथे गर्दी वाढल्याने शारीरिक अंतराच्या नियमाचाही फज्जा उडाला आहे. येथे बालकांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांचाच वावर असतो. शिवाय कोरोनाचे कोणतेच नियम पाळण्यात येत नसल्याने संसर्ग असलेला रुग्ण या बाजारात असल्यास तो संसर्ग इतरांपर्यंत चुटकीसरशी पोहोचण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन आठवडी बाजारात कोरोनासंदर्भात उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

प्रतिबंधित बाबींमध्ये वाढ

शासन निर्देशाप्रमाणे कोविड -१९ साथरोगाच्या मिशन बिगीन अगेनअंतर्गत वेळोवेळी सुरू केलेले नियम व प्रतिबंधित बाबींना जिल्हा गडचिरोली सीमा क्षेत्रात (कन्टोनमेंट झोन वगळून) जमावबंदी व टाळेबंदीसंदर्भात नियमावली आणि उपाययोजना कालावधी वाढविण्यात आला असून हा कालावधी ३१ डिसेंबर २०२० च्या रात्री १२ वाजेपर्यंत राहणार आहे. याअंतर्गत जिल्हा गडचिरोली सीमा क्षेत्रात (कन्टोनमेंट झोन वगळून) ज्या बाबींना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी अनुज्ञेय आहे ते ३१ डिसेंबरपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असेल; तर ज्या बाबींना प्रतिबंध आहे त्यांना पुढील आदेशापर्यंत सुरू करता येणार नाही. 

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशातील सर्व निर्देश, सूचना, अटी व शर्तीचे पालन करणे सर्व संबंधितांना बंधनकारक असेल, असे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण दीपक सिंगला यांनी कळविले आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com