esakal | यवतमाळ जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत संचारबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; जाणून घ्या नियम 
sakal

बोलून बातमी शोधा

Curfew in Yavatmal district till 28 February

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. यवतमाळ, पांढरकवडा तसेच पुसद परिसरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

यवतमाळ जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत संचारबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; जाणून घ्या नियम 

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला ऍलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून तसे आदेशही गुरुवारी (ता.18) जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. यवतमाळ, पांढरकवडा तसेच पुसद परिसरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात बाजारपेठेची वेळ रात्री आठपर्यंत करण्यात आली आहे. शहरी, ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी तसेच जमावाने एकत्र येण्यावर बंदी आहे. धार्मिक स्वरूपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेह सम्मेलने, सामूहिक कार्यक्रम, सभा, बैठका आदीकरीता केवळ 50 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. मिरवणूक, रॅली काढण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात येत आहे.

हेही वाचा - धक्कादायक! आजीसोबत फिरणाऱ्या चार वर्षीय चिमुकल्याला घेऊन युवक पसार; तब्बल २० तास उलटूनही पत्ता...

हे आहेत नियम 

अंत्यविधीसाठी केवळ 20 व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल, पानटपरी, चहाची टपरी, चौपाटी आदी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा, हॅन्ड सॅनिटायझर व सोशल डिस्टसिंगचे नियम पाळणे बंधनकारक राहील. जिल्ह्यातील बाजारपेठेच्या वेळेत बदल करण्यात आले आहे. बाजारपेठ रात्री आठ वाजेपावेतो सुरू राहतील. जिल्ह्यातील शाळा इयत्ता पाचवी ते नववीपर्यंत सुरू असलेल्या फक्त नगर परिषद, नगर पंचायत क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये, सर्व प्रकारची खासगी शैक्षणिक संस्था, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्‍लासेस 28 फेब्रुवारी मध्यरात्रीपर्यंत बंद राहतील. 

या कालावधीत ऑनलाइन, दूरस्थ शिक्षण पद्धतीला परवानगी राहील. खासगी आस्थापना, दुकाने या ठिकाणी मास्क, फेसकव्हर घालून असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा. रेस्टॉरंट, हॉटेल सकाळी आठ ते रात्री 9.30 वाजता पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. होम डिलेवरी करण्याकरिता रात्री 11.30 वाजेपर्यंत मुभा राहील. रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये दोन टेबलच्या मध्ये सामाजिक अंतर सहा फूट राखणे बंधनकारक राहील. जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार सायंकाळी पाच वाजतापर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. सदर आदेश शुक्रवारी (ता. 19) मध्यरात्री पासून लागू होणार आहेत.

मास्क न लावणे पडणार महागात

नागरिकांना मास्क न लावणे, सामाजिक अंतर न ठेवणे इत्यादी आदेशाचे उल्लंघन करणे महागात पडणार आहे. संबंधित व्यक्तीवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क न वापरणे प्रथम आढळल्यास 500 रुपये, दुसऱ्यांदा 750 रुपये तर तिसऱ्यांदा व त्यानंतर आढळल्यास एक हजार रुपये दंड व फौजदारी कारवाई होणार आहे. दुकानदार, फळे, भाजीपाला विक्रेते, सर्व जीवनावश्‍यक वस्तूविक्रेते आणि ग्राहकांनी सामाजिक अंतर न राखणे आवश्‍यक आहे. आस्थापना मालक दुकानदार, विक्रेता यांना दोन हजार रुपये दंड, त्यानंतर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. किराणा, जीवनावश्‍यक वस्तू विक्रेत्याने वस्तूंचे दरपत्रक न लावणे याबाबत दोन हजार रुपये दंड आहे.

हेही वाचा - आता याला काय म्हणावं! मयतीला आले अन् चोरी करून गेले; पाहुण्याविरुद्ध गुन्हा दाखल

लग्नासाठी 50 व्यक्तींना परवानगी

लग्न समारंभ खुले लॉन, मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 व्यक्तींच्या मर्यादेत संख्या ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. सामाजिक अंतराचे पालन करून रात्री 10 वाजेपर्यंत लग्नसमारंभाला परवानगी राहील. लग्न समारंभाकरीता तहसीलदार, मुख्याधिकारी व पोलिस विभाग यांना माहिती देणे बंधनकारक आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image