एकच फाइट... मार्केट टाइट!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

नागपूर - पेट्रोलपंपांवर तौबा गर्दी... एटीएम मशीन बंद... बॅंका बंद... भाजी मार्केटमध्ये सन्नाटा... ऑटोरिक्षांचे मीटर डाउन... अशी आणीबाणीसारखी स्थिती आज नागपूरकरांनी अनुभवली. मात्र, इथे परिस्थिती पूर्णपणे उलट होती. पाचशे-हजारच्या चलनी नोटा रातोरात बंद झाल्या आणि एकाचवेळी अख्खे नागपूरकर पैसा खर्च करण्यासाठी घराबाहेर पडले. प्रत्येकाला पाचशे-हजारची नोट मोडून सुटे पैसे मिळवायचे होते. पण, दुकानदार-विक्रेते सुटे द्यायला तयार नाहीत. पेट्रोल असो किंवा भाजी, किराणा असो किंवा कपडे... खरेदीसाठी कमीत कमी पाचशे किंवा हजार असे दोनच पर्याय होते.

नागपूर - पेट्रोलपंपांवर तौबा गर्दी... एटीएम मशीन बंद... बॅंका बंद... भाजी मार्केटमध्ये सन्नाटा... ऑटोरिक्षांचे मीटर डाउन... अशी आणीबाणीसारखी स्थिती आज नागपूरकरांनी अनुभवली. मात्र, इथे परिस्थिती पूर्णपणे उलट होती. पाचशे-हजारच्या चलनी नोटा रातोरात बंद झाल्या आणि एकाचवेळी अख्खे नागपूरकर पैसा खर्च करण्यासाठी घराबाहेर पडले. प्रत्येकाला पाचशे-हजारची नोट मोडून सुटे पैसे मिळवायचे होते. पण, दुकानदार-विक्रेते सुटे द्यायला तयार नाहीत. पेट्रोल असो किंवा भाजी, किराणा असो किंवा कपडे... खरेदीसाठी कमीत कमी पाचशे किंवा हजार असे दोनच पर्याय होते. एवढेच कशाला ऑटोचे भाडे आणि एसटीचे तिकीट या दोन्हींसाठी प्रवासी पाचशेचीच नोट बाहेर काढत होते. आज पाचशे-हजारपेक्षा ज्याच्याकडे शंभरच्या नोट आहेत तोच श्रीमंत, अशी स्थिती निर्माण झाली. "कुणी सुटे देता का रे?' असे डायलॉग दिवसभर ऐकायला येत होते. पॅनिक होण्याची गरज नव्हती, तरीही लोकांची तारांबळ उडाली. आणखी दोन-तीन दिवस याच अवस्थेतून जावे लागण्याचीही शक्‍यता आहे. मात्र, दडलेल्या पाचशे-हजारच्या नोट आज घराघरांतून बाहेर निघाल्या आणि खर्च होण्यासाठी तडफडू लागल्या. एकूणच कधी नव्हे, ते भरपूर पैसा असूनही एकाच फाइटमध्ये आज मार्केट टाइट झाले होते..!

हॉटेल व्यवसाय प्रभावित
बाहेरगावहून हॉटेलमध्ये आलेल्या प्रवाशांची सुटे पैसे नसल्याने मोठी गैरसोय झाली. शिवाय टॅक्‍सीचालकांनीही पाचशे-हजारच्या नोटा घेण्यास नकार दिला. साधी पाण्याची बॉटल खरेदी करणेही अशक्‍य झाले. अनेकांना तर आल्यापावली माघारी परतावे लागले. यामुळे हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला. शहरातील 90 टक्के हॉटेल व्यवसायिकांचा व्यवसाय नगदीच होतो. त्यातील अनेक हॉटेल्समध्ये स्वॉप मशीन नाहीत. त्यामुळेदेखील ग्राहकांसोबत वाद झाले.
-प्रकाश त्रिवेदी नागपूर रेसिडेन्सी हॉटेल असोसिएशन
 

कळमन्यात लागले फलक
कळमना बाजारात भाजी, फळ, धान्य आदी वस्तू खरेदी करण्यासाठी आलेल्या छोट्या व्यापाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागला. कृषी उत्पन्न बाजार समितीत सेस स्वीकारणाऱ्या रोखपालाने 500 आणि 1,000 रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत, असे चक्क फलकच लावले होते. बाजारात आणलेल्या वस्तू घेऊन जाणाऱ्या लहान व्यापाऱ्यांना सुटे पैसे नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सुट्या पैशांसाठी त्यांना भटकंती करावी लागली. त्यामुळे सेस भरण्यावरून व्यापारी आणि रोखपालांमध्ये वादावादी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार 500 आणि 1,000 रुपयांच्या नोटा घेतल्या नसल्याचे समितीचे सभापती शेख अहमद यांनी स्पष्ट केले.

Web Title: currency affected petrol pump