आठवड्याचा प्रत्येक बुधवार आता ‘सायकल डे’; वाहनांना प्रवेशास मनाई, कोणी घेतला निर्णय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cycle Day on Wednesday in Amravati Municipal Corporation

महापालिकेतील ज्येष्ठ अधिकाऱ्यांना सायकलवर बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, प्रदूषण रोखण्यासाठी सुरू केलेल्या अभियानाचे कौतुकही केले. यापुढे दर बुधवारी अधिकारी व कर्मचारी सायकलनेच येतील, अशी सूचना आयुक्तांनी प्रशासनाला केली. दर बुधवारी वाहनांना महापालिकेत प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

आठवड्याचा प्रत्येक बुधवार आता ‘सायकल डे’; वाहनांना प्रवेशास मनाई, कोणी घेतला निर्णय?

अमरावती : माझी वसुंधरा अभियानाचा श्रीगणेशा करताना महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी आपली शासकीय व खासगी वाहने घरी ठेवून सायकलने कार्यालय गाठले. महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच पार्किंग झोन रिकामे होते. अभियानास मिळालेला प्रतिसाद बघता आयुक्त प्रशांत रोडे यांनी यापुढे दर बुधवारी सर्वांनी सायकलनेच कार्यालयात यावे, अशी सूचना जारी केली.

सकाळी दहा वाजता महापालिकेतील कार्यालये सुरू होतात. त्याअगोदर काही अधिकारी व कर्मचारी सायकलने पोहोचले. ज्यांच्याकडे सायकली नाहीत, ते पायदळ आले. आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त सुरेश पाटील, सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे कार्यालयीन वेळेत सायकलने पोहोचले. महापैर चेतन गावंडेही सायकलवर आले. काही पदाधिकारी व नगरसेवक आलेच नाहीत. अनेकांना सायकल नसण्याचा फटका बसला.

सविस्तर वाचा - टूथपेस्ट'वरील रंगीत पट्ट्यांचा अर्थ तरी काय?

महापालिकेतील ज्येष्ठ अधिकाऱ्यांना सायकलवर बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, प्रदूषण रोखण्यासाठी सुरू केलेल्या अभियानाचे कौतुकही केले. यापुढे दर बुधवारी अधिकारी व कर्मचारी सायकलनेच येतील, अशी सूचना आयुक्तांनी प्रशासनाला केली. दर बुधवारी वाहनांना महापालिकेत प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

३१ मार्चपर्यंत वसुंधरा अभियान चालणार आहे. या उपक्रमात पहिल्या दिवशी नगरसेवक विलास इंगोले, तुषार भारतीय, पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख, शहर अभियंता रवींद्र पवार, सहायक आयुक्‍त योगेश पीठे, अमित डेंगरे, पशुशल्यचिकित्सक डॉ. सचिन बोंद्रे, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, सायकल फॉर हेल्थ ॲण्ड फन यांनी सहभाग घेतला.

अधिक माहितीसाठी - हायवेने प्रवास करीत असाल तर दंडाचे पाचशे रुपये जवळ ठेवा!

व्याप्ती वाढविण्याची गरज

आरोग्य व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा व अधिनस्त अधिकारी, कर्मचाऱ्यांसह परिसरातील किमान पाच नागरिकांना याचे महत्त्व पटवून अभियानाची व्याप्ती वाढविण्याविषयी सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्‍त प्रशांत रोडे यांनी केले.

नागरिकांनी सहभाग घ्यावा

सायकल चालविल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. अमरावतीकर नागरिकांनी या अभियानासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सर्व सामाजिक संस्थांनी विविध उपक्रम राबवावे. शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापौर चेतन गावंडे यांनी केले.

संपादन - नीलेश डाखोरे

loading image
go to top