सिलिंडर फुटल्याने चहाचे दुकान जळून खाक 

file Photo
file Photo

नरखेड (जि.नागपूर):  स्थानिक गांधी चौकातील बाजारपेठेत अकर्ते बंधूंच्या मालकीच्या जागेवरील चहाच्या दुकानात सिलिंडर फुटल्यामुळे चहाचे दुकान जळून खाक झाले. शेजारच्या ताज किराणा, नागपूरकर हेअर सलूनच्या दुकानांचे शटर्स तुटून काचा फुटल्या. डॉ. बिहारे यांच्या दवाखान्यालाही हादरे बसल्याने जीवनावश्‍यक वस्तूंची पडझड झाली.
शनिवारी (ता. 5) पहाटेची घटना असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. शनिवारी पहाटेच्या सुमारास हिरालाल सोनकुसळे यांच्या चहाच्या दुकानातील सिलिंडर फुटल्यामुळे मोठा धमाका झाला. त्यामुळे चहाच्या दुकानातील फर्निचरसह सर्व वस्तू जळून खाक झाल्या. नवरात्रीमुळे लक्ष्मीच्या प्रतिमेजवळील पणती जळत असल्याचे अनेकांनी सांगितले. पणतीची जळती वात उंदराने ओढल्यामुळे 19 किलोग्रॅमच्या सिलिंडरने पेट घेतला, त्याचे तुकडे तुकडे होऊन इतरत्र उडाले. चहाचे हॉटेल पूर्णतः जळून खाक झाले. त्यात त्याचे 20 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे कळते. या फुटलेल्या सिलिंडरच्या धमाक्‍याचा आवाज नगरातील 2 किलोमीटर परिसरात चांगलाच गुंजला. त्यात ताज किराणा, नागपूरकर हेअर सलून व डॉ. बिहारे यांच्या दवाखान्यालाही त्याचे हादरे सहन करावे लागले. नवरात्रीदरम्यान या घटनेसमयी रस्त्यावरून देवीच्या दर्शनासाठी भक्तांची वर्दळ नव्हती. नाहीतर मोठी जीवितहानी झाली असतसी. दुर्गादेवीने सर्वांचे रक्षण केल्याचा सूर सर्वत्र उमटत आहे. घटनेचा पंचनामा तलाठी व पालिका कर्मचाऱ्यांनी केला खरा, पण गर्दीच्या जागेवर चहाचे व इतर हॉटेल चालविणाऱ्यांनी घरगुती सिलिंडर वापरण्यावर निर्बंध घालण्याचे आदेश गॅस वितरक, तहसीलदार व पोलिस यंत्रणेने द्यावेत अशी मागणी सर्वत्र जोर धरत आहे. 
यापूर्वीच्या घटना 
काही वर्षांपूर्वी याच जागेवरील अकर्ते जनरल स्टोअर्सही शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाले होते. समोर असणारे सुरेश कासे यांच्या चहाच्या दुकानातील स्टोव्ह भडकल्यामुळे दुकान जळून खाक झाले व तिघा तरुणांचा जीव गेला होता, हे विशेष.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com