नुकसान 15 हजार हेक्‍टरचे, पाहणी दोन शेतांची  भिवापूर तालुक्‍यातील 15 हजार 567 हेक्‍टर पिकांचे नुकसान 33 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक 

अमर मोकाशी
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

अंधारामुळे पूर्वनियोजित ठिकाणी जाऊन पाहणी करणे शक्‍य नव्हते. यामुळे केवळ दोन शेतांची पाहणी करून पथक अहवाल देणार आहे. यामुळे मदत किती व कशी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

भिवापूर, (जि. नागपूर) :  केंद्राच्या पथकाने मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात थातूरमातूर पाहणी करून आढावा घेत नागपूरचा रस्ता धरला. यामुळे पाहणीचा केवळ देखावा करण्यात आल्याची भावना शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे. पथकातील अधिकाऱ्यांविषयी प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. 

अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे भिवापूर तालुक्‍यात पिकांची मोठी हानी झाली. नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेले पथक सोमवारी (ता. 25) सायंकाळी भिवापूरला पोहोचले. अंधारामुळे पूर्वनियोजित ठिकाणी जाऊन पाहणी करणे शक्‍य नव्हते. यामुळे केवळ दोन शेतांची पाहणी करून पथक अहवाल देणार आहे. यामुळे मदत किती व कशी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सर्वाधिक फटका धानाला

तालुक्‍यात जुलै ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात प्रचंड पाऊस झाल्याने सोयाबीन, धान, कापूस, ऊस आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. पुरामुळे शेकडो हेक्‍टर जमिनी खरडून निघाल्यात. त्यानंतर ऑक्‍टोबर महिन्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला. याचा सर्वाधिक फटका धानाला बसून शेकडो हेक्‍टरमधील पीक वाया गेले. यंदा तालुक्‍यात एकूण 42 हजार 32.9 हेक्‍टर क्षेत्रात विविध पिकांची लागवड करण्यात आली. त्यात धान 2 हजार 954, सोयाबीन 18 हजार 263, तूर 1 हजार 563, कापूस 15 हजार 133, मिरची 926, हळद 145.50, शिंगाडा 2, भाजिपाला 564 व ऊस 31.5 हेक्‍टरमध्ये असल्याची नोंद आहे. 

शासनाकडून यादी तयार

जुलै ते सप्टेंबर महिन्यात तालुक्‍यात तीनदा अतिवृष्टी झाली यात सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झाले. ज्या पिकांचे 33 टक्‍क्‍यांवर नुकसान झाले, अशा पिकांची शासनाकडून यादी तयार करण्यात आली. अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या पिकांचे एकूण क्षेत्र हे 15 हजार 567.37 हेक्‍टर इतके आहे. या नुकसानाने बाधित शेतकऱ्यांची संख्या 23 हजार 323 एवढी आहे. त्यांच्या पिकांचे 33 टक्‍क्‍यांच्यावर नुकसान झाले आहे. 

नोंदीपेक्षाही अधिक नुकसान

नुकसानीची ही आकडेवारी शासकीय यंत्रणेने तयार केली असली तरी प्रत्यक्षात पिकांचे नुकसान हे खूप अधिक आहे. या नुकसानीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. झालेले नुकसान भरून निघणे शक्‍य नाही. परंतु, तातडीने मदत देऊन शासनाने शेतकऱ्यांच्या जखमांवर फुंकर घालावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. नुकसानीच्या सूचीत ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने 398 हेक्‍टरमधील धानाचे पीक बाधित झाले. तर अतिवृष्टीने आलेल्या पुरामुळे नदी व नाल्यांकाठची केवळ 8.47 हेक्‍टर जमीन खरडून गेल्याचे दर्शविण्यात आलेले आहे. प्रत्यक्षात हे नुकसान अधिक असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage of crop in Bhiwapur taluka