धरणांच्या सुरक्षिततेची 15 जुलैपर्यंत तपासणी

file photo
file photo

अमरावती : कोकणातील तिवरे धरण फुटीच्या पार्श्‍वभूमीवर आता राज्यातील सर्व धरणांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 15 जुलैपर्यंत धरण सुरक्षितता संघटनेकडे धरणांच्या स्थितीचा अहवाल सादर करायचा आहे. राज्यातील सहा महसूल प्रदेशांतील 2,108 धरणांची तपासणी करण्यात येणार असून त्यामध्ये अमरावती विभागातील 340 धरणांचा समावेश आहे.
दरवर्षी पूर्ण झालेल्या धरणांची पावसाळापूर्व व पावसाळोत्तर तपासणी केल्या जाते. वर्ग 1 श्रेणीतील धरणांची तपासणी अधीक्षक अभियंता, श्रेणी 2 व 3 च्या धरणांची तपासणी कार्यकारी अभियंता स्तरावर, तसेच 10 टक्के धरणांची तपासणी संघटनेच्या स्तराहून केल्या जाणार आहे. तपासणीचा अहवाल क्षेत्रीय अभियंता स्तराहून धरण सुरक्षितता संघटना नाशिककडे 15 जुलैपर्यंत सादर करायचा आहे. त्यावर संघटना धरणांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना सुचविणार आहे.
नाशिकच्या धरण सुरक्षितता संघटनेकडून तिवरे धरण फुटीच्या घटनेनंतर पुन्हा अलर्ट देण्यात आला असून राज्यातील 2108 धरणांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अहवालानुसार राज्यातील श्रेणी 1 मध्ये 265, श्रेणी 2 मध्ये 1093 व श्रेणी 3 मधील 750, अशा एकूण 2108 धरणांच्या सुरक्षिततेच्या तपासणीचा अहवाल मागविण्यात आला आहे. अमरावती विभागात 9 मोठे, 23 मध्यम व 469 लघू प्रकल्प आहेत. यापैकी श्रेणी 1 मध्ये 22, श्रेणी 2 मध्ये 185 व श्रेणी 3 मध्ये 135 अशा एकूण 340 धरणांचा समावेश आहे.
उपकरणांकडे दुर्लक्ष
धरणांतील जलसाठा व भूगर्भातील हालचालींचा धरणाच्या रचनेवर पडणाऱ्या परिणामांचा वेध घेण्यासाठी उपकरणे बसविली आहेत. भूकंप, भूगर्भातील घडामोडीप्रसंगी निर्माण होणाऱ्या कंपणांमुळे निर्माण होणारी स्थिती व रचनेवर पडणारा दाब, बांधकामावरील ताण, उतार, जमिनीवरील दाब याचे मोजमाप करणारी ती उपकरणे आहेत. त्यांच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने संभाव्य स्थितीचा अंदाज घेणे कठीण आहे. ही सर्व उपकरणे या मोहिमेत तपासली जाणार आहेत. प्राथमिक अहवालानुसार राज्यातील 4,328 पैकी 2,394 उपकरणे बंद आहेत. अमरावती विभागातील 91 टक्के उपकरणे नादुरुस्त असल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com