"दंडारी'च्या उत्सवावर कोरोनाचा कहर; शेकडो वर्षांची परंपरा प्रथमच खंडित

पराग भानारकर 
Friday, 20 November 2020

"दंडार' या लोककलेला फार मोठी जुनी परंपरा आहे. गावातील लोक दिवाळी आधी गावातीलच पुरुषांना एकत्र करून दंडारीची तालीम करतात. नाटक स्वरूपाच्या या दंडारी मध्ये स्त्री कलावंताची भूमिका पुरुषच करतात.

नागभीड (जि. चंद्रपूर) : कोरोना विषाणूंच्या संक्रमणामुळे सर्व प्रकारचे सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रमावर बंदी आहे. त्यामुळे यंदा ग्रामीण भागात दिवाळी निमित्त होणारी 'दंडार' गावागावात होऊ शकली नाही. यानिमित्ताने होणारी आर्थिक उलाढाली पूर्णविराम मिळाला. परिणामी छोट्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले.

"दंडार' या लोककलेला फार मोठी जुनी परंपरा आहे. गावातील लोक दिवाळी आधी गावातीलच पुरुषांना एकत्र करून दंडारीची तालीम करतात. नाटक स्वरूपाच्या या दंडारी मध्ये स्त्री कलावंताची भूमिका पुरुषच करतात. गावातीलच छोट्या डेकोरेशन वाल्याकडे मंडप व मंच सजावटीची तयारी दिली जाते. 

सविस्तर वाचा - दुर्दैवी! फराळाचे पदार्थ करताना अचानक घरात पसरला धूर आणि क्षणाधार्त संसाराची झाली राखरांगोळी

गावातीलच तबला,हार्मोनियम वादक आणि भजनी मंडळी संगीत विषय सांभाळत असतात. ज्येष्ठ मंडळी या दंडारीची तालीम नवख्याना देत असतात. नेपथ्य, वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा या सगळ्या जबाबदाऱ्या गावातील जाणकार मंडळी सांभाळत असतात. वेशभूषेसाठी गावातीलच महिलांचे जुने कपडे वापरले जाते. भूमिकेनुसार सर्व कपड्यांची जमवाजमव केली जाते. नेपथ्य प्रकारात सुरवातीला गण म्हणताना बंडीच्या चाकाचा वापर केला जातो..

यावर कलावंतांना उभे करून त्यांच्या हाती अगरबत्ती देत गण म्हटल्या जाते. चाकाला दोन माणस खालील बाजूने फिरवत असतात. ते दिसणार नाही याची काळजी घेतली जाते.. पाहणाऱ्याला आपण सिनेमातील दृश्‍य बघत आहोत असा भास होतो.

भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी दंडारीचे प्रयोग होतात. दिवसभर मंडई आणि भडकी दंडार सादर होत असतात. गावात लघु जत्रेचे स्वरूप यानिमित्ताने आलेले असते. खेळणी विक्रेते, स्त्रियांचे दागदागिने अशी छोटी मोठी दुकाने लावली जातात. मात्र कोरोनामुळे दंडारीला चांगलाच फटका बसला.

दंडार बसली आणि उठली

दंडारी चा प्रयोग हा रात्रभर चालतो यामुळे घरी आलेले पाहुणे मनसोक्त आनंद घेतात. गावातीलच नौकरी निमित्ताने गावाबाहेर असलेले सर्व नोकरदार गावात येतात त्यांना या निमित्ताने उद्‌घाटन करण्याची संधी दिली जाते. रसिक मायबाप व ज्येष्ठ मंडळी देणगी स्वरूपात दंडारीला आर्थिक मदत करत असतात. रात्री 10 वाजेपासून सुरू होणार हा प्रयोग पहाटे 5 पर्यन्त सुरू असतो.. दंडारीला आलेला खर्च जर लोकांच्या देणगीतून निघाला तर दंडार 'उठली' आणि खर्च निघाला नाही तर दंडार 'बसली' असे संबोधले जाते.. दंडारीच्या प्रयोगातून सामाजिक प्रबोधन केल्या जाते.

जाणून घ्या - दुर्दैवी! शेतात कामासाठी गेला शेतकरी; सापाने तब्बल तीन वेळा दंश केल्याने गेला जीव

गेल्या शेकडो वर्षांपासून मंडई आणि दंडारीची परंपरा आजतागायत सुरू होती. मात्र कोरोना यावर्षी दंडार अनेक गावात होऊ शकली नाही. या मुळे अनेक छोट्या व्यावसायिकांना तोटा सहन करावा लागला.
- ताराचंद भोयर
दंडार आयोजक, देवपायली

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dandari festival cancelled due to corona in Nagbhid