दर्डा एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जुलै 2016

दोन शिक्षकांना अटक - पालकांसह संतप्त जमावाची शाळेवर धडक
यवतमाळ - यवतमाळ पब्लिक स्कूल या शाळेतील चार ते पाच चिमुकल्या विद्यार्थिनींवर त्याच शाळेतील दोन शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. या प्रकरणात दोन शिक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे.

दोन शिक्षकांना अटक - पालकांसह संतप्त जमावाची शाळेवर धडक
यवतमाळ - यवतमाळ पब्लिक स्कूल या शाळेतील चार ते पाच चिमुकल्या विद्यार्थिनींवर त्याच शाळेतील दोन शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. या प्रकरणात दोन शिक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे.

यवतमाळात या घटनेमुळे प्रचंड संतापाचे वातावरण असून, या घटनेच्या निषेधार्थ उद्या, गुरुवारी (ता. 30) सर्व पक्षांनी "यवतमाळ बंद‘चे आवाहन केले आहे. ही शाळा चालविणाऱ्या जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष खासदार विजय दर्डा असून, दर्डा परिवाराकडून या संस्थेचे व्यवस्थापन सांभाळले जाते.

ही घटना उघडकीस आल्याबरोबर संतप्त पालकांसह विविध संघटनांचे कार्यकर्ते आज शाळेवर धडकले. "दर्डा हाय हाय‘ अशा घोषणा देत त्यांनी संताप व्यक्त केला. संबंधित शिक्षकांना अटक करण्यासाठी नागरिकांनी वडगाव रोड पोलिस ठाण्याला घेराव घातला. वातावरण तापत असल्याचे पाहून पोलिसांनी छुप्या मार्गाने जाऊन दोन शिक्षकांना अटक केली. यश बोरुंदिया व अमोल क्षीरसागर अशी या शिक्षकांची नावे आहेत.

येथील दर्डानगरात जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित यवतमाळ पब्लिक स्कूल आहे. शाळेतील एका शिक्षिकेच्या सात वर्षीय मुलीला काल मंगळवारी (ता. 28) रात्रीच्या सुमारास असह्य वेदना होत होत्या. त्या शिक्षिकेने मुलीला खासगी रुग्णालयात नेले असता मुलीवर अत्याचार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. त्या शिक्षिकेने इतर पालकांशी चर्चा केली असता, अशाच स्वरूपाच्या चार ते पाच तक्रारी पुढे आल्या.

पीडित मुलींच्या पालकांनी एकत्र येऊन ही बाब येथील शाळा व्यवस्थापनाचे प्रतिनिधी किशोर दर्डा व मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आणली. त्यांनी याबाबत काही पालकांची बैठक घेतली. मात्र, तोपर्यंत ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते शाळेवर मोर्चा घेऊन आले. कॉंग्रेस वगळता भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांचा त्यात समावेश होता.

या प्रकरणी पोलिसांनी दोन शिक्षकांवर कलम 354, 354 (अ) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा-2012 मधील कलम 8, 10 व 12 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Darda Education Society school on the school's sexual harassment