"डेटा' बनला मनपासाठी अडसर 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

महापालिकेसमोर एजंसीकडून डेटा मिळण्याची प्रतीक्षा करणे किंवा संचालकांच्या परवानगीची वाट बघणे इतकाच पर्याय शिल्लक आहे. दरम्यान महापौर चेतन गावंडे यांनी एजंसीकडून डेटा मिळवून देण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. हा डेटा मिळाल्यानंतरच कर आकारणी करता येणार आहे

अमरावती : मालमत्तांचे सर्वेक्षण व कर आकारणीच्या मुद्यावर सोमवारी (ता.24) महापौरांच्या अध्यक्षतेत झालेल्या प्रशासकीय बैठकीत पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय झाला. आता ही बैठक शुक्रवारी (ता.24) होणार आहे व त्यामध्ये अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे आयुक्त संजय निपाणे यांनी सांगितले.

हे वाचा— अनैतिक संबंधातून अल्पवयीन मुलीने दिला मृत बाळाला जन्म, नंतर घडले असे काही...

एजंसीची टाळाटाळ

दरम्यान, शासकीय एजंसीकडून डेटा मिळवण्याचे कठीण आव्हान मनपासमोर असून तो न मिळाल्यास शासनाकडून स्वबळावर सर्वेक्षणाची प्रक्रिया करण्यासाठी परवानगी मिळवण्याचे दुसरे आव्हान आहे.
करवाढीसंदर्भातील प्रशासकीय प्रस्ताव शासनाकडून अद्याप विखंडीत झालेला नाही. दरम्यान ज्या महापालिकांमधील मालमत्तांचे सर्वेक्षण 70 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात झाले आहे, त्या महापालिकांनी शासननियुक्त एजंसीकडून डेटा मागवून पुढील प्रक्रिया करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. अमरावती महापालिकेत शासन नियुक्त एजंसीने 81.89 टक्के काम केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या महापालिकेस एजंसीकडून डेटा मागवावा लागणार आहे. तो मागण्यासाठी एजंसीला पत्र देण्यात आले असले तरी एजंसीने मात्र त्यास प्रतिसाद दिलेला नाही. महानगरपालिका प्रशासन विभागाचे संचालक यांना एजंसी डेटा देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे मनपा प्रशासनाने कळविले असून स्वबळावर प्रक्रिया प्रारंभ करण्याची परवानगी मागितली असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

हे वाचा—गुड इव्हनिंग! दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी!

 बैठकी ठरताहेत निष्फळ

महापालिकेसमोर एजंसीकडून डेटा मिळण्याची प्रतीक्षा करणे किंवा संचालकांच्या परवानगीची वाट बघणे इतकाच पर्याय शिल्लक आहे. दरम्यान महापौर चेतन गावंडे यांनी एजंसीकडून डेटा मिळवून देण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. हा डेटा मिळाल्यानंतरच कर आकारणी करता येणार आहे.कर आकारणीसाठी मनपा प्रशासनाला सभागृहासमोर जावे लागणार असून धोरण निश्‍चित करून शासनाला पाठवायचे आहे. मात्र मुळ अडचण डेटा ही असून त्यावरच मनपाचे घोडे अडले आहे. शुक्रवारी याच मुद्‌द्‌यावर पुन्हा महापौरांच्या अध्यक्षतेत गटनेत्यांची बैठक होणार असून त्यामध्ये अंतिम निर्णय होणार आहे. सोमवारी झालेल्या बैठकीस महापौर चेतन गावंडे, मनपा आयुक्त संजय निपाणे, उपमहापौर कूसूम साहू, स्थायी समिती सभापती बाळू भुयार, सभागृह नेता सुनील काळे, विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, गटनेता चेतन पवार, अ. नाजीम, ज्येष्ठ नगरसेवक विलास इंगोले, मिलींद चिमोटे, प्रकाश बनसोड, तुषार भारतीय, संजय नरवणे, नगरसेविका संध्या टिकले, करनिर्धारण अधिकारी महेश देशमुख, सह अधिकारी प्रमोद येवतीकर प्रामुख्याने उपस्थित होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Data 'becomes a barrier for the corporation