झामुमो नेत्याची सून, नातवंडं नागपुरात गवसली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

नागपूर : झारखंड मुक्ती मोर्चाच्या ज्येष्ठ नेत्याच्या सुनेने कौटुंबिक कलहातून घर सोडले. घरातून निघताना चारही मुलांनाही सोबत घेतले होते. तपासादरम्यान सून आणि मुले हटिया-पुणे एक्‍स्प्रेसमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. शनिवारी ही गाडी नागपूर स्थानकावर येताच पाचही जणांना गाडीतून उतरवून घेण्यात आले. रात्री उशिरा नेत्याचा मुलगा रेल्वेस्थानकावर पोहोचला पत्नीची समजूत काढत तिला आणि मुलांना सोबत घरी घेऊन गेला.

महिला झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते चंपई सोरेन यांची सून असल्याचे सांगितले जाते. त्यांचा मुलगा बाबूलाल संतापी स्वरूपाचा असून अनेकदा वादात राहिला आहे. पोलिस अधिकाऱ्याला धमकावल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यातही घेतले होते. पत्नीसोबतही बाबूलालचा नेहमीच वाद होतो. दोघांमध्ये टोकाचे भांडण झाल्याने पत्नीने घर सोडण्याचा निर्णय घेतला. घरून निघताना आपली दोन मुले आणि दोन मुलींनाही तिने सोबत घेतले. चारही मुले 8 ते 14 वर्षे वयोगटातील असल्याचे कळते. नेत्याच्या सून मुलांसह निघून गेल्याने स्थानिक पोलिस यंत्रणेत एकच खळबळ उडाली. तपास सुरू असताना सर्वजण हटिया-पुणे एक्‍स्प्रेसमधून प्रवास करीत असल्याचे पुढे आले. त्यावेळी गाडी नागपूर स्थानकाच्या आसपास असल्याने नियंत्रण कक्षाद्वारे रेल्वे सुरक्षा दलाला माहिती देण्यात आली. बाबूलालही विमानाने नागपूरकडे निघाले. ही गाडी नागपूर स्थानकावर येताच आरपीएफ जवानांनी शोध घेत चौघांनाही खाली उतरवून घेतले. यानंतर हे प्रकरण लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, सोरेन यांनी नागपुरातील नातेवाइकांना फोन करून रेल्वेस्थानकावर जाण्यास सांगितले. पण, पत्नीने नातेवाइकासोबत जाण्यास नकार दिला. शनिवारी रात्री बाबूलाल रेल्वेस्थानकावर पोहोचल्यानंतर पती-पत्नीत चर्चा झाली. यानंतर सर्वजण सोबत जमशेदपूरकडे रवाना झाले.
लोहमार्ग पोलिसांचे तोंडावर बोट
प्रकरण लोहमार्ग पोलिसांकडे सोपविण्यात आले असले तरी त्यांच्याकडून कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली. विचारणा करूनही माहिती देण्यात आली नाही. विशेष म्हणजे हायप्रोफाईल प्रकरण असल्याने कुठलीही नोंदसुद्धा करण्यात आली नाही. ठाण्यातील हालचालींबाबत स्टेशन डायरीवरील कर्मचाऱ्याला माहिती असणे अपेक्षित आहे. परंतु, त्यांच्याकडेही कुठलीच माहिती नव्हती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The daughter-in-law of the JMM leader, The grandchildren moved to Nagpur