स्वरांच्या दिव्यांनी उजळली दिवाळीची पहाट

गडचिरोली : दीपावलीनिमित्त आयोजित मैफलीत गीतगायन करताना विजय गटलेवार व इतर गायक.
गडचिरोली : दीपावलीनिमित्त आयोजित मैफलीत गीतगायन करताना विजय गटलेवार व इतर गायक.

गडचिरोली : अजबगजब विचार मंचाच्या वतीने शुक्रवारी (ता. 25) आयोजित "पहाट स्वरांच्या दिव्यांची' या स्वरमैफलीचा कार्यक्रम झाला. दु:ख, निराशा, उदासीनतेचा अंधार दूर सारत आनंदाचे प्रकाशपर्व घेऊन येणारा दिवाळीचा सण यंदा तेजस्वी दिव्यांनी झगमगण्यासोबत गडचिरोलीकरांना सुमधुर स्वरांची भेट घेऊन आला. गडचिरोलीकरांना दरवर्षी विविध कार्यक्रमाचा नजराणा देणाऱ्या अजबगजब विचारमंचाने दिवाळीच्या पहिल्या दिवशी धनत्रयोदशीला ही स्वरांची पहाट आणली.
स्थानिक कॅम्प एरिया परिसरातील हनुमान मंदिर बागेजवळील शहीद अजय उरकुडे चौकात आयोजित या कार्यक्रमात सारेगमप या टीव्ही शोचे विजेते, तारक मेहता का उल्टा चष्मा या प्रख्यात मालिकेचे पार्श्‍वगायक तथा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या व राष्ट्रीय पुरस्कार पटकाविणाऱ्या भोंगा या चित्रपटाचे संगीत निर्माते प्रख्यात गायक विजय गटलेवार यांनी आपल्या खास गायनशैलीतील गझल, चित्रपटगीत, भजनांसोबत उडत्या चालीची गीते गात रसिकांची मने जिंकली. सोबतच झी टीव्ही फेम भूषण जाधव यांनी अनेक सुमधुर गीतांनी या मैफलीला स्वरांचा साज चढविला. पूर्णाजी खांदोळे, अनुराधा पेंडसे, प्रेम धिरालाल, स्नेहा डोंगरे या गायकांनीही या दिवाळी पहाटेला आपल्या सुरांची पखरण करत ही दिवाळी सूरमय केली. या मैफलीत प्रख्यात गीतकार सईद अख्तर यांनीही आपले अनुभव कथन करीत मैफल रंजक केली. या मैफलीचे उद्‌घाटन नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजीव ओहोळ, प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे संतोष तंगडपल्लीवार, प्राचार्य समशेर खान पठाण, नगर परिषदेचे बांधकाम सभापती आनंद शृंगारपवार, पत्रकार मुकुंद जोशी, नगरसेवक सतीश विधाते यांच्या हस्ते झाले. या मैफलीत मराठी व हिंदी भजन, भावगीत, भूपाळी व विविध सुमधुर गीतांचा नजराणा पेश करण्यात आला. या स्वरमैफलीचा प्रारंभ भूषण जाधव यांनी "सूर निरागस हो' या गणेशवंदनेने केला. त्यानंतर "कानडा राजा पंढरीचा', "माझे माहेर पंढरी' अशी भजने गाताना भक्तीरसाची उधळण केली. विजय गटलेवार यांनी आपल्या संगीत कारकिर्दीतील आठवणींना उजाळा देत प्रख्यात शायर इलाही जमादार यांची "करार केला' ही गझल सादर केली. शिवाय त्यांनी सादर केलेले "मन उधाण वाऱ्याचे' हे गीतही रसिकांना स्वरलहरींवर डोलावणारे ठरले. अभंग, गझल, प्रेमगीतांनी भारावलेल्या या मैफलीला थोडा विनोदी तडका देत "निंगलं नाम्या लगीन कराले' हे झाडीपट्टी रंगभूमीत गाजलेले गीतही सादर केले. याशिवाय "दीपावली मनाये सुहानी', "साईनाथ तेरे हजारो हात' अशा अनेक सुमधुर भक्ती गीतांनी या मैफलीची रंगत वाढवत नेली. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या मैफलीची सांगता "माऊली माऊली रूप तुझे' या अभंगाने करण्यात आली. या मैफलीसाठी अजबगजब विचारमंचाचे सतीश त्रिनगरीवार, सतीश विधाते, आशुतोष कोरडे, सचिन मून, विश्राम होकम, डॉ. प्रशांत चलाख, सुभाष धंदरे, दत्तू सूत्रपवार, जयंत भुते तथा हनुमान मंदिर सेवा समिती कॅम्प एरिया आदींनी सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com